ठळक मुद्देभारतीय संघातील धोनीचा सख्खा मित्र असलेल्या सुरेश रैनाने धोनीला हॅल्मेटवर तिरंगा लावण्याबाबत आग्रह केला होता. पण धोनीने त्याची ही विनंती नाकारली.
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे भारतीय सेनादलाविषयीचे प्रेम सर्वश्रृत आहेच, पण तरीही तो देशाचा झेंडा असलेले हॅल्मेट वापरत नाही, हे ऐकल्यावर आश्चर्याचा धक्का बसेल. पण त्यामागचे कारणही धोनीने सांगितले आहे.
भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आपल्या ह्रॅल्मेटवर तिरंगा वापरायला सुरुवात केली. त्यानंतर भारतीय संघातील जवळपास सर्वच क्रिकेटपटूंनी तिरंगा असलेले हॅल्मेट वापरायला सुरुवात केली. पण धोनीने मात्र हॅल्मेटवर तिरंगा परीधान केल्याचे कधीही पाहायला मिळालेले नाही.
भारतीय सेनादलामध्ये धोनी लेफ्टनंट कर्नल या पदावर आहे. हे मानद पद आहे. धोनीच्या यष्टीरक्षणाच्या ग्लोव्जवरही सेनादलाचे चिन्ह आहे. पण तो कधीही तिरंगा असलेले हॅल्मेट वापरत नाही. भारतीय संघातील धोनीचा सख्खा मित्र असलेल्या सुरेश रैनाने धोनीला हॅल्मेटवर तिरंगा लावण्याबाबत आग्रह केला होता. पण धोनीने त्याची ही विनंती नाकारली.
धोनी हा यष्टीरक्षक आहे. फिरकीपटू किंवा मध्यमगती गोलंदाजांना तो यष्ट्यांजवळ उभं राहत आपली जबाबदारी निभावत असतो. त्यावेळी तो हॅल्मेट वापरतोही, पण जेव्हा वेगवान गोलंदाजांपुढे यष्टीरक्षण करण्याची वेळ येते, तेव्हा मात्र तो हॅल्मेट घालत नाही. त्यावेळी हॅल्मेट मैदानावर ठेवावे लागते. तिरंगा जमिनीवर ठेवणे, हा त्या झेंड्याचा अपमान आहे, असे धोनीला वाटते. गोलंदाजीत बदल होत असताना प्रत्येकवेळी हॅल्मेट पेव्हेलियनमध्ये पाठवता येईल, असे नाही. त्यामुळे धोनीने अजूनपर्यंत ईच्छा असूनही तिरंगा असलेले हॅल्मेट वापरलेले नाही.