Join us  

'धोनी भाई'मुळे खलील अहमदला सुखद धक्का; अनुभवला अविस्मरणीय क्षण

नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जेतेपद पटकावले. या स्पर्धेत युवा गोलंदाज खलील अहमदला भारताच्या वन डे संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 9:20 AM

Open in App

दुबई : नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जेतेपद पटकावले. या स्पर्धेत युवा गोलंदाज खलील अहमदला भारताच्या वन डे संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली. जेतेपदाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात रोहितने आशिया चषक खलीलकडे सोपवला आणि त्याला चषक उंचावण्यास सांगितले. हे सर्वांनी पाहिले. पण, महेंद्रसिंग धोनीमुळे खलीलला जेतेपदाचा चषक उंचावण्याचा मान मिळाला, हे सांगितले तर नवल वाटेल. पण, हे खरे आहे आणि खलीलनेच हे सांगितले. 

धोनी हा भारतीय संघाचा कर्णधार नसला तरी संघाच्या निर्णयामध्ये त्याचा सहभाग असतोच. भारतीय संघ अडचणीत सापडला असताना कर्णधार कोणीही असो, तो पहिला धोनीचा सल्ला घेतो. त्याशिवाय धोनी युवा खेळाडूंनाही मोलाचे मार्गदर्शन करत असतो. भारताने सातव्यांदा आशिया चषक जिंकल्यानंतर धोनीने रोहितकडे एक विनंती केली. त्याने जेतेपदाचा चषक खलीलकडे सोपवण्यास सांगितले. रोहितनेही त्याच्या विनंतीला मान देत तसे केले आणि या युवा खेळाडूने आयुष्यातील अविस्मरणीय क्षण अनुभवला.

खलीलने सांगितले की,''व्यासपीठावर जेतेपदाचा चषक माझ्याकडे द्यावा अशी विनंती धोनी भाई यांनी रोहित शर्माकडे केली होती. संघातीय युवा सदस्य असल्यामुळे तो चषक माझ्या हातात देण्यात आला. तो माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता.''    राजस्थानच्या 20 वर्षीय खलीलने हाँगकाँगविरुद्ध पदार्पण केले आणि 10 षटकांत 3 बाद 48 अशी कामगिरी केली. चषक हातात घेतल्यानंतरच्या अनुभवावर खलील म्हणाला,'' धोनी भाई आणि रोहित यांनी मला चषक घेण्यास सांगितले, त्यावेळी माझ्याकडे कोणतेच शब्द नव्हते. मी खूप भावनिक झालो होतो आणि हा क्षण कधीच विसरणार नाही.'' 

टॅग्स :आशिया चषकमहेंद्रसिंह धोनी