लंडन : क्रिकेटसाठी विराट कोहली, बेन स्टोंक्स यांच्या प्रमाणे महेंद्रसिंह धोनी आणि राहूल द्रविड या महानायकांची देखील क्रिकेटला गरज असल्याचे प्रतिपादन आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेविड रिचर्डसन यांनी केले.
एमसीसी २०१८ च्या व्याख्यानात रिचर्डसन बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ‘मैदानावर महानायकांची गरज आहे. कोलिन मिलबर्न्स, फ्रेडी फ्लिंटॉफ, शेन वॉर्न, विराट कोहली, बेन स्टोंक्स या सारख्या खेळाडूंसोबतच फ्रॅँक वॅरेल, महेंद्रसिंह धोनी, राहूल द्रविड यासारख्या महानायकांची गरज आहे. कारण त्यामुळे आम्ही योग्य दिशेने जात आहोत हे आम्ही सुनिश्चित करु शकू.’ रिचर्डसन यांनी मान्य केले की आयसीसीकडे सर्व आव्हानांचे उत्तर नाही. मात्र, ‘आम्ही त्यावर उत्तर शोधण्याचे प्रयत्न करत आहोत, असेही त्यांनी म्हटले.
‘वैयक्तिक वाद, बाद झाल्यानंतर फलंदाजावर क्षेत्ररक्षकांकडून होणारी टीका, अनावश्यक शारिरीक संपर्क, चेंडूशी छेडछाड असे सर्व प्रकार निराशाजनक आहेत. आपल्याला जगापुढे आपला खेळ घेऊन जायचे असून हा असा अखिलाडूवृत्तीचा खेळ नाही,’ असेही रिचर्डसन यांनी म्हटले. (वृत्तसंस्था)