दुबई : भारताचा सलामीवीर शिखर धवन याने कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान मिळवले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये त्याने २४ वे स्थान पटकावले. तर रवींद्र जडेजा याने गोलंदाजांच्या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे.
धवनने अफगाणिस्तान विरोधात बंगळुरूत झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात १०७ धावा केल्या. तो कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी उपहाराच्या आधी शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू बनला. विजय यानेदेखील १०५ धावांची खेळी केली. त्याने सहा स्थानांची झेप घेत २३ वे स्थान गाठले आहे. भारताचा फिरकीपटू रवींद्र जडेजा याने देखील एका स्थानाने आपले रँकिंग सुधारत तिसरे स्थान पटकावले. त्याने बंगळुरू कसोटीमध्ये तिसरे स्थान पटकावले. वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याने २५, तर उमेश यादवने २६ वे स्थान पटकावले.