नागपूर - युवा सलामीवीर फलंदाज देविका वैद्यची शतकी खेळी अखेर व्यर्थच ठरली. इंग्लंडविरुद्ध मंगळवारी खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात भारत ‘अ’ संघाला चार गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.
विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या लढतीत २० वर्षीय देविकाने १५० चेंडूंना सामोरे जाताना १०४ धावा केल्या. त्यात १४ चौकारांचा समावेश आहे. या शतकी खेळीच्या जोरावर देविकाने इंग्लंडविरुद्ध ६ एप्रिलपासून खेळल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी अंतिम संघात स्थान मिळवण्याचा आपला दावा अधिक मजबूत केला. देविका व्यतिरिक्त कर्णधार दीप्ती शर्मा व मोना मेश्राम यांनी प्रत्येकी ३१ धावांचे योगदान दिले. भारत ‘अ’ संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ४ बाद २११ धावांची मजल मारली.
या सराव सामन्यात सर्व खेळाडूंना खेळण्याची मुभा होती, पण केवळ ११ खेळाडूंना फलंदाजी व गोलंदाजी करण्याची संधी होती. इंग्लंडने ६ गड्यांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले, पण त्यानंतर फलंदाजीचा सराव करताना अखेर ४९.२ षटकांत २५२ धावा केल्या.
इंग्लंडतर्फे टॅमी ब्युमोंटने ५२ व डॅनियली व्हाईटने ४३ धावा केल्या. भारतातर्फे आॅफ स्पिनर अनुजा पाटीलने ३३ धावांच्या मोबदल्यात ३ आणि मध्यमगती गोलंदाज तनुश्री सरकारने १६ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले.
भारत आणि इंग्लंड महिला संघांदरम्यान ६ एप्रिलपासून जामठा येथील याच मैदानावर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. मालिकेतील दुसरा व तिसरा सामना अनुक्रमे ९ व १२ एप्रिल रोजी खेळल्या जाईल. याआधी झालेल्या आॅस्टेÑलियाविरुद्धच्या मालिकेत भारताचा एकतर्फी पराभव झालेला असल्याने आता यजमानांपुढे खेळ उंचावण्याचे आव्हान असेल.