कोलंबो : पावसाच्या व्यत्यय आलेल्या सामन्यात इंग्लंडला महिला विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध धक्कादायक पराभव कसाबसा टाळता आला. पावसामुळे प्रत्येकी ३१ षटकांचा खेळविण्यात आलेल्या सामन्यात इंग्लंडने ३१ षटकांत ९ बाद १३३ धावा केल्या. यानंतर पाकिस्तानने ६.४ षटकांत बिनबाद ३४ धावा केल्यानंतर पुन्हा पाऊस आला आणि सामना रद्द झाला.
सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेत इंग्लंडची २५ षटकांत ७ बाद ७९ धावा अशी अवस्था केली. कर्णधार फातिमा सनाने २७ धावांत ४ बळी घेतले. यानंतर पावसामुळे सुमारे साडेचार तास खेळ थांबला आणि प्रत्येकी ३१ षटकांचा सामना खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला. सामना सुरू झाल्यानंतर सहा षटकांमध्ये इंग्लंडने ५४ धावा फटकावून दमदार पुनरागमन केले. चार्ली डीनने ५१ चेंडूंत ३ चौकारांसह ३३ धावा काढल्या, एम. एर्लोटने २३ चेंडूंत १८ धावा केल्या. यानंतर पाकने आश्वासक सुरुवात केली. ओमैमा सोहैलने १८ चेंडूंत ४ चौकारांसह नाबाद १९, तर मुनीबा अलीने २२ चेंडूंत नाबाद ९ धावा केल्या. दोघींनी चांगली सुरुवात करून दिली, परंतु पुन्हा पावसाचे आगमन झाल्याने अखेर सामना रद्द झाला आणि पाकच्या विजयाची संधीही हुकली.