नवी दिल्ली : आयपीएलच्या गुणतालिकेत पुन्हा एकदा तळाच्या स्थानावर राहण्याच्या स्थितीत असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला शुक्रवारी ‘प्ले आॅफ’साठी पात्र ठरलेल्या चेन्नई सुपरकिंग्सवर विजय नोंदविण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावावी लागेल. सुपरकिंग्स १२ सामन्यात आठ विजयांसह १६ गुणांची कमाई करीत द्वितीय स्थानावर आहे. दिल्ली संघ १२ सामन्यात केवळ तीन विजयासंह सहा गुण घेत अखेरच्या स्थानावर आहे. अखेरचे दोन्ही सामने जिंकले तरी दिल्ली संघ तळाच्याच स्थानावर राहील, हे निश्चित. दिल्ली संघ याआधी २०११, २०१३ आणि २०१४ साली देखील अखेरच्याच स्थानावर होता.
उभय संघात ३० एप्रिल रोजी पुण्यात सामना झाला. त्यात चेन्नईने १३ धावांनी बाजी मारली. या विजयाचे हीरो शेन वॉटसन आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी राहीले. डेअरडेव्हिल्सला मात्र मोठ्या खेळाडूंनी निराश केले. रिषभ पंत आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांच्यावरच त्यांची फलंदाजी विसंबून आहे. पंतने १२ सामन्यात ५८२ आणि अय्यरने ३८६ धावा ठोकल्या.
युवा फलंदाज पृथ्वी शॉने २१६, विजय शंकरने ११ सामन्यात १३३, ग्लेन मॅक्सवेल १४२, जेसन राय १२०, कोलिन मुन्रो ६३, डॅन ख्रिस्टियनने चार सामन्यात केवळ २६ धावा केल्या.
गोलंदाजीत ट्रेंट बोल्टने १२ सामन्यात १५, अमित मिश्राने आठ सामन्यात ७, राहुल तेवतिया आठ सामन्यात ६, ख्रिस्टियन चार सामन्यात चार, ख्रिस मॉरिसने तीन, लियॉम प्लंकेटने सहा सामन्यात चार व मोहम्मद शमीने चार सामन्यात तीन बळी घेतले. स्टार बोल्टचा अपवाद वगळल्यास दिल्लीकडून लक्षवेधी मारा झाला नाही. (वृत्तसंस्था)
दुसरीकडे सुपरकिंग्सने फलंदाज आणि गोलंदाजांच्या बळावर नॉकआऊटचा मार्ग प्रशस्त केला. अंबाती रायुडूने १२ सामन्यात ५३५, कर्णधार धोनी ४१३, वाटसन ४२४ आणि सुरेश रैनाने ११ सामन्यात ३१५ धावा केल्या आहेत. ड्वेन ब्राव्होने १२ सामन्यात १३३, फाफ डुप्लेसिसने तीन सामन्यात ७१, सॅम बिलिंग्स आठ सामन्यात १०७ आणि रवींद्र जडेजाने १२ सामन्यात ५९ धावा केल्या आहेत.
सुपरकिंग्सची गोलंदाजी थोडी कमकुवत आहे. शार्दुल ठाकूरने नऊ सामन्यात ११ तर ब्राव्होने नऊ गडी बाद केले. दीपक चाहर, हरभजनसिंग आणि जडेजा यांनी प्रत्येकी सात गडी बाद केले. वॉटसन आणि इम्रान ताहिर यांच्या नावावर प्रत्येकी सहा बळी असून डेव्हिड विली आणि कर्ण शर्मा यांनी मात्र निराश केले.