Join us  

दिल्ली कॅपिटल्सचा संघ आणखी कमकुवत झाला; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार 

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी धडपडणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला सोमवारी मोठा धक्का बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 5:42 PM

Open in App

IPL 2024, Big Blow for DC : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी धडपडणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला सोमवारी मोठा धक्का बसला आहे. IPL 2024 मध्ये दिल्लीला ८ सामन्यांत फक्त ३ विजय मिळवता आले आहेत आणि ६ गुणांसह हा संघ आठव्या क्रमांकावर आहे. प्ले ऑफसाठी त्यांना उर्वरित ६ सामन्यांत किमान पाच विजय मिळवावे लागणार आहेत. शनिवारी घरच्या मैदानावर दिल्लीला सनरायझर्स हैदराबादकडून ६७ धावांनी दारूण पराभव पत्करावा लागला. त्यात संघातील स्टार खेळाडूने आयपीएल २०२४च्या उर्वरित सामन्यांतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

हॅमस्ट्रींग दुखापतीच्या उपचारासाठी DC चा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श ( Mitchell Marsh ) हा मायदेशात म्हणजेच ऑस्ट्रेलियात गेला होता. पण, आता त्याने भारतात न परतण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो उर्वरित आयपीएलला मुकणार आहे.  ESPNCricinfo ने दिलेल्या वृत्तानुसार मिचेल मार्श मायदेशातून भारतात परतलेला नाही. अमेरिका आणि कॅरिबियनमध्ये १ जूनपासून खेळल्या जाणाऱ्या आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ साठी तंदुरुस्त होण्यासाठी मार्शने दुखापतीतून सावरण्यासाठी आयपीएलकडे पाठ फिरवण्याचा निर्णय घेतला आहे.  

मिचेल मार्श ३ एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात शेवटचा खेळला होता आणि त्यानंतर तो मुंबई इंडियन्स व लखनौ सुपर जायंट्स यांच्याविरुद्धच्या सामन्याला मुकला होता. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत मार्शकडे ऑस्ट्रेलिया संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे दुखापत झाल्यावर तो लगेच मायदेशात परतला आणि तो MI विरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतात परतणे अपेक्षित होते. त्याची माघार हा दिल्ली कॅपिटल्ससाठी मोठा धक्का आहे. तो जरी फॉर्मात नसला तरी संघाचा तो महत्त्वाचा सदस्य होता. त्याने ४ सामन्यांत ६१ धावा केल्या आणि फक्त १ विकेट घेतली.

याआधी लुंगी एनगिडीने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आणि हॅरी ब्रूकनेही वैयक्तिक कारणास्तव आयपीएल खेळणे टाळले. डेव्हिड वॉर्नर व इशांत शर्मा यांनाही दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकावे लागले होते. दिल्लीने मार्शची रिप्लेसमेंट अद्याप जाहीर केलेली नाही आणि त्यांनी अधिकृत घोषणाही केलेली नाही.   

टॅग्स :आयपीएल २०२४दिल्ली कॅपिटल्स