Join us  

दिल्लीचा आरसीबीवर २५ धावांनी विजय; डब्ल्यूपीएल : शेफाली, ॲलिस, जेस, मारिझान कॅप यांची शानदार कामगिरी

आरसीबीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 6:05 AM

Open in App

बंगळुरू : शेफाली वर्मा, ॲलीस कॅप्सी यांची शानदार फलंदाजी आणि जेस जोनासन, मारिझान कॅप यांच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने महिला टी-२० लीग क्रिकेट स्पर्धेत (डब्ल्यूपीएल) गुरुवारी राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूवर २५ धावांनी शानदार विजय मिळवला.

आरसीबीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने २० षटकांत ५ बाद १९४ धावा केल्या. राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूला २० षटकांत ९ बाद १६९ धावांवर रोखत दिल्लीने विजय साकारला.

विजयासाठी १९५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीकडून स्मृती मानधना आणि सोफी डिव्हाईन (२३) यांनी ७७ धावांची सलामी दिली. स्मृतीने ४३ चेंडूंत १० चौकार व तीन षट्कारांसह ७४ धावा केल्या. त्यानंतर एस. मेघना (३६) आणि रिचा घोष (१९) यांनी झुंज दिली. पण, ठरावीक अंतराने फलंदाज बाद झाल्याने आरसीबीचा पराभव झाला. दिल्लीकडून जेस जोनासन हिने तीन, मारिझान आणि अरुंधती यांनी प्रत्येकी दोन तर शिखा पांडेने एक गडी बाद केला.

त्याआधी, दिल्लीकडून मेग लॅनिंग (११) आणि शेफाली वर्मा यांनी २८ धावांची सलामी दिली. त्यानंतर शेफालीने ॲलीस कॅप्सीच्या साथीत दुसऱ्या गड्यासाठी ८२ धावांची भागीदारी करताना संघाला शतकी मजल मारून दिली. शेफालीने ३१ चेंडूंत तीन चौकार आणि चार षट्कारांसह ५० धावा केल्या. ॲलीस कॅप्सीने ४६ धावा केल्या. त्यानंतर मारिझान कॅप आणि जेस जोनासन यांनी संघाला १९४ पर्यंत नेले. मारिझानने ३२, तर जेसने नाबाद ३६ धावा केल्या. आरसीबीकडून सोफी डिव्हाइन आणि नादिन दी क्लर्क यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर श्रेयांका पाटीलने एक बळी घेतला. 

संक्षिप्त धावफलकदिल्ली कॅपिटल्स २० षटकांत ५ बाद १९४ धावा (शेफाली वर्मा ५०, ॲलीस कॅप्सी ४६) गोलंदाजी : सोफी डिव्हाइन २-२३, नादिन दी क्लर्क २-३५.राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू : २० षटकांत ९ बाद १६९ धावा (स्मृती मानधना ७४, एस. मेघना ३६) गोलंदाजी : जेस जोनासन ३-२१, मारिझान कॅप २-३५.

टॅग्स :महिला टी-२० क्रिकेट