भारतीय गोलंदाज दीप्ती शर्मापेक्षाही कंजूष आहेत या तिघी; जाणून घ्या त्यांची कामगिरी

दीप्तीनं आफ्रिकेविरुद्ध 3-3-0-3 अशी थक्क करायला लावणारी कामगिरी केली होती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 01:33 PM2019-09-26T13:33:14+5:302019-09-26T13:33:47+5:30

whatsapp join usJoin us
Deepti Sharma shines with exceptional spell in India's win over South Africa, but in record list she is come at number four | भारतीय गोलंदाज दीप्ती शर्मापेक्षाही कंजूष आहेत या तिघी; जाणून घ्या त्यांची कामगिरी

भारतीय गोलंदाज दीप्ती शर्मापेक्षाही कंजूष आहेत या तिघी; जाणून घ्या त्यांची कामगिरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

-ललित झांबरे 
टी-20 क्रिकेटमध्ये जिथे पहिल्या चेंडूपासूनच मारधाड सुरू होते आणि गोलंदाजांना योग्य दिशा व टप्पा गवसेपर्यंतच त्यांच्या वाट्याची चार षटके संपून गेलेली असतात, अशा प्रकारच्या क्रिकेटमध्ये कुणी सलग तीन षटके निर्धाव टाकत असेल, 19 व्या चेंडूपर्यंत आपल्या गोलंदाजीवर फलंदाजांना एकही धाव घेऊ देत नसेल तर त्या गोलंदाजाला 'सॅल्युटच' करायला पाहिजे. अशी सॅल्यूट करायला लावणारी कामगिरी आपली ऑफ स्पिनर दीप्ती शर्माने मंगळवारी सुरत येथे दक्षिण आफ्रिकेवरील टी-20 विजयात केली. या सामन्यात दिप्तीच्या गोलंदाजीचे विश्लेषण 4 षटके 3 निर्धाव 8 धावा आणि 3 बळी असे राहिले. यादरम्यान एकवेळ तर तिची कामगिरी 3-3-0-3 अशी थक्क करायला लावणारी होती. 

साहजिकच या कामगिरीने दीप्ती ही टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सलग तीन निर्धाव षटके टाकणारी पहिली भारतीय गोलंदाज (पुरुष वा महिला) ठरली. या 22 वर्षीय ऑफ स्पिनरच्या या कमाल गोलंदाजीमुळेच भारताने हा सामना 11 धावांनी जिंकला. विशेष म्हणजे दिप्तीने तीन टप्प्यात आपल्या गोलंदाजीचा चार षटकांचा कोटा पूर्ण केला पण चेंडूची टप्पा व दिशेवरचे अचूक नियंत्रण तिने कायम राखले. म्हणूनच आपल्या तब्बल 19 व्या चेंडूपर्यंत तिने ए  कही धाव दिलेली नव्हती. 

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात (पुरुष व महिला) एवढे निर्धाव चेंडू टाकणारी दिप्ती ही केवळ चौथीच गोलंदाज! टी-20 सामन्यात 3-3-0-3 अशी गोलंदाजी करुनही दीप्ती चौथी..आश्चर्य वाटले ना? आणि दीप्ती चौथी तर पहिल्या तीन कोण, असा प्रश्नही पडला असेल. तर टी-20 इंटरनॅशनलमध्ये दीप्ती शर्मापेक्षाही टाईट करणाऱ्या या आहेत त्या तीन गोलंदाज...

1) पेरीस मामुन्या (टांझानिया) : 4-4-0-0 ;  24 चे 24 चेंडू निर्धाव
17 वर्षांच्या या ऑफ स्पिनरने यंदा 22 जून रोजी मालीविरुध्दच्या सामन्यात ही अफलातून गोलंदाजी केली. माली संघाच्या 12.5 षटकांच्या अवघ्या 17 धावांच्या डावात या पठ्ठीने  पूर्ण चार षटकांचा कोटा गोलंदाजी केली आणि 24 चेंडू टाकून एकसुध्दा धाव दिली नाही. 
2) कॅरोल नामुजेन्यी (युगांडा) :  4-3-1-1;  पहिली धाव- 23 वा चेंडू
कॅरोल ही 29 वर्षांची मध्यमगती गोलंदाज. तिने 8 जुलै 2018 ला टी-20 विश्वचषक पात्रता सामन्यात सलग 22 चेंडू निर्धाव टाकले आणि 23 वा चेंडू वाईड टाकला नसता तर हिच्या नावावरसुध्दा पेरिस मामुन्याप्रमाणे चारच्या चार षटके निर्धाव टाकण्याचा विक्रम लागला असता. 

3) तस्नीम ग्रँजर (झिम्बाब्वे): 4-3-6-2; पहिली धाव- 22 वा चेंडू
झिम्बाब्वेची ही 25 वर्षीय लेगब्रेक गोलंदाज. तिने 6 मे 2019 रोजीच्या टांझानियाविरुध्दच्या सामन्यात आपल्या 22 व्या चेंडूपर्यंत एकही धाव दिलेली नव्हती. 22 वा चेंडू तिने वाईड टाकला. 
4) दीप्ती शर्मा (भारत) : 4-3-8-3; पहिली धाव- 19 वा चेंडू
22 वर्षीय ऑफ स्पिनर दीप्ती शर्माची 24 सप्टेंबर 2019 रोजी सुरत येथे एकवेळ कामगिरी 3-3-0-3 अशी अफलातून होती. सलग 18 चेंडूवर तिने फलंदाजांना धाव घेवू दिलेली नव्हती मात्र तिच्या 19 व्या चेंडूवर दोन धावा निघाल्या.

या चौघींच्या नंतर रवांडाची मार्गारेट हुमीलिया (3-3-0-2 वि. माली), नामीबियाची काँन्स्टॉशिया कौरिपेके (3-3-0-1 वि. लिसोथो) आणि पाकिस्तानची अनाम अमीन (3-3-0-1 वि. बांगलादेश)  यांनी आपल्या गोलंदाजीत फलंदाजांना एकही धाव दिलेली नाही. या तिघींनीही आपल्या वाट्याला आलेले 18 च्या 18 चेंडू निर्धाव टाकले आहेत.

Web Title: Deepti Sharma shines with exceptional spell in India's win over South Africa, but in record list she is come at number four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.