- अयाझ मेमन
(संपादकीय सल्लागार)
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेच्या थराराला सुरुवात झाली असून भारताच्या दोन महत्त्वपूर्ण निर्णयांविषयी मी चर्चा करणार आहे. पहिले म्हणजे भारतीय संघाने ५ फलंदाज आणि ५ गोलंदाज खेळविण्याचा निर्णय घेतला, जो अनेकांना पसंत नव्हता. कारण, आफ्रिकेच्या खेळपट्टीवर पुनरागमन करणारा डेल स्टेन, मॉर्नी मॉर्केल, वेर्नोन फिलेंडर असे गोलंदाज त्रासदायक ठरू शकतात. पण माझ्या मते हा निर्णय एक प्रकारे चांगला आहे. कारण, तुमची इच्छा सामना जिंकण्याची असून सामना ड्रॉ करण्याची नाही. त्यामुळे कर्णधाराला ५ गोलंदाजांची आवश्यकता आहे. शमी, भुवनेश्वर, हार्दिक आणि पदार्पण करणारा जसप्रीत बुमराह या वेगवान गोलंदाजांसह आश्विनचा पर्याय कोहलीकडे आहे. कदाचित यामुळे भारताची फलंदाजी क्रमवारी थोडी कमजोर भासत असेल. पण जर का आश्विन, साहा आणि हार्दिक यांची बॅट तळपली तर प्रतिस्पर्धी संघासाठी खूप अडचणीचे ठरेल. शिवाय भुवनेश्वरही चांगल्या फलंदाजीची क्षमता राखून आहे. त्यामुळे फलंदाजी जास्त कमजोर झाल्याचे मला मान्य नाही. नक्कीच या निर्णयामध्ये ‘रिस्क’ आहे, पण याशिवाय जीवनात आणि क्रिकेटमध्ये काय फायदा?
दुसरा निर्णय खूप वादाचा ठरेल. जे पाच फलंदाज निवडले गेले, त्यामध्ये अजिंक्य रहाणे याला बसविण्यात आले. तो उपकर्णधार असून त्याचा परदेशातील रेकॉर्ड खूप शानदार आहे. त्याच्या जागी रोहित शर्माची निवड करण्यात आली. रोहित सध्या फॉर्ममध्ये असून त्याने श्रीलंकेविरुद्ध कसोटीमध्ये शतक, एकदिवसीयमध्ये द्विशतक आणि टी२०मध्येही शतक झळकावले. इथे नक्कीच परिस्थिती वेगळी आहे, पण तो सध्या खूप फॉर्ममध्ये असून त्याचा आत्मविश्वासही दुणावला आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात फॉर्ममध्ये असलेल्या रोहितला खेळवायचे की रहाणेला, असा प्रश्न संघ व्यवस्थापनाला पडला असेल. गेल्या तीन-चार महिन्यांमधील कामगिरी पाहिल्यास रहाणे कोणत्याही फॉर्मेटमध्ये विशेष काही करू शकला नाही. सहा महिन्यांपूर्वीची कामगिरी नक्कीच चमकदार राहिली असेल, पण गेल्या काही महिन्यांत रहाणेने निराशा केली आहे. तो सध्या फॉर्म मिळवण्यासाठी झगडतोय; आणि अशा परस्थितीमध्ये पुन्हा रहाणेला खेळण्याची संधी दिली व तो अपयशी ठरला तर रहाणेचाही आत्मविश्वास जाईल आणि संघाचीही स्थिती बिघडेल. अजिंक्य रहाणेसारखा खेळाडू संघाबाहेर असल्यास खूप दु:ख होते, पण सध्याची परिस्थिती पाहता माझ्या मते हा योग्य निर्णय आहे.