नवी दिल्ली : जर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) विश्व अॅन्टी डोपिंग एजन्सीच्या (वाडा) अधिपत्याखाली असेल आणि ते आपल्या खेळाडूंची चाचणी त्यांच्याअंतर्गत करीत असतील तर सरकारची कोणतीही हरकत नाही. बीसीसीआय भारतीय क्रिकेटपटूंची ‘डोप टेस्ट’ राष्ट्रीय डोपिंगविरोधी एजन्सी (नाडा) तर्फे करू शकली असती; पण आता जबाबदारी ‘वाडा’वर असून त्यांनी भारतीय बोर्डाकडून आपल्या आचारसंहितचे पालन करून घ्यायचे आहे, असे मत केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी रविवारी व्यक्त केले.
दिल्ली मॅरेथॉन स्पर्धेच्या उद्घाटनानंतर राठोड हे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते. ते म्हणाले, तीन जण महत्त्वपूर्ण असतात. खेळाडू, प्रशिक्षक-कोच आणि प्रशंसक. जेव्हा डोपिंग होते तेव्हा प्रशंसकांसोबत धोका होतो; कारण प्रशंसक हे खेळाडूंना आदर्श मानत असतात. त्यामुळे प्रत्येक क्रीडा संघटनेने हे निश्चित करायला हवे की खेळात कुठलाही धोका व्हायला नको. मला आनंदच आहे की, बाहेरील एजन्सी क्रिकेटमध्ये डोपिंग नियंत्रण करीत आहे. दरम्यान, बीसीसीआयने राष्ट्रीय डोपिंगविरोधी एजन्सी (नाडा) ला खडे बोल सुनावले होते. भारतीय क्रिकेटपटूंची डोप टेस्ट करणे हे त्यांच्या अधिकारात येत नाही, असे सांगत
त्यांनी वाद पुढे नेला होता. बीसीसीआय राष्ट्रीय क्रीडा महासंघ नसून त्यांचीच विद्यमान डोपिंगविरोधी व्यवस्था
चांगली आहे, असे ८ नोव्हेंबरला बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांनी नाडाप्रमुखांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. (वृत्तसंस्था)
देशातील सर्व संघटना आणि काही दुसरे देशही आपल्या राष्ट्रीय डोपिंगविरोधी एजन्सीवर (नाडा) विश्वास ठेवतात. क्रिकेटरसुद्धा ठेवू शकतील. आम्ही आता विश्व डोपिंगविरोधी एजन्सीवर (वाडा) ही जबाबदारी टाकू शकतो; कारण हे त्यांचे काम आहे. आयसीसीचे रजिस्ट्रेशन वाडामार्फत झालेले आहे. क्रिकेटपटूंची डोप टेस्ट करावी हे त्यांनी आता निश्चित करावे. भारतीय क्रिकेटपटूंच्या डोप टेस्टचा प्रश्न सुटू शकतो. आम्हाला त्याबाबत काही समस्या नाही.