अयाझ मेमन, संपादकीय सल्लागार
इंग्लंडने आॅस्ट्रेलियाला ५-० ने व्हाईटवॉश दिला. हा निकाल अनपेक्षित असाच राहिला आहे. नेहमी असा निकाल पाहायला मिळत नाही. कारण आॅस्ट्रेलियासारख्या संघाविरुद्ध एवढ्या मोठ्या फरकाने विजय मिळवणे म्हणजे मोठी करामतच. बऱ्याचदा आपण पाहतो की, इंग्लंडचा संघ आॅस्ट्रेलियाविरुद्ध सहज जिंकलेला नाही.स्कॉटलँडकडून पराभवाचा धक्का बसल्यानंतर इंग्लंड संघ एकदम जागा झाला. हा मजबूत संघ आहे. त्यांच्याकडे मॅचविनिंग खेळाडू आहेत.
पहिल्या क्रमांकापासून सातव्या क्रमांकापर्यंतचे असे खेळाडू त्यांच्याकडे आहेत. त्यांनी आॅस्ट्रेलियाची अवस्था खराब करून टाकली. त्यांच्याकडे डेव्हिड वॉर्नर, मिशेल स्टार्क यासारखे तगडे खेळाडू नाहीत. हा संघ कमजोर दिसतोय. असे असले तरी ५-० असा विजय खूप मोठा असतो. यातून भारतासाठी मात्र मोठा इशारा आहे. कारण इंग्लंडला इंग्लंडमध्ये पराभूत करणे सोपे नाही. २०१४ मध्ये झालेल्या दौºयात भारत कसोटी मालिकेत पराभूत झाला होता, मात्र वन डेत जिंकला होता. आता वन डे मालिका येत आहेत. त्याआधी आयर्लंडविरुद्ध टी-२० सामनेही होतील. मात्र, वन डे महत्त्वपूर्ण असेल. कारण हाच अनुभव भारताला पुढील वर्षी विश्वचषकासाठी उपयोगात येईल. त्यामुळे भारताला इंग्लंडविरुद्ध पूर्णत: आशावादीपणे मैदानात उतरावे लागेल. या कामगिरीमुळे भारताचा आत्मविश्वासही वाढेल. परंतु, इंग्लंड सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांच्याविरुद्ध खेळणे हे आव्हानात्मकच असेल. इंग्लंडचा आॅस्ट्रेलियावरील विजय हा भारतासाठी धोक्याची घंटाम्हणता येईल.