Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात आता उत्सुकता निर्विवाद वर्चस्वाची!

टीम इंडिया आणि आॅस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा निकाल तसा लागला आहे. सलग तीन सामने जिंकत यजमान भारताने बाजी मारलेली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 01:47 IST

Open in App

- हर्षा भोगले लिहितात...टीम इंडिया आणि आॅस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा निकाल तसा लागला आहे. सलग तीन सामने जिंकत यजमान भारताने बाजी मारलेली आहे. त्यामुळे या मालिकेत आता रस राहिलेला नसल्याचे काहींना वाटत असेल. प्रत्येक संघ जिंकण्यासाठीच खेळतो. यामुळे तुम्ही पराभूत झाल्यावर उर्वरित मालिका निरर्थक वाटणे समजण्यासारखे आहे. तरीही उर्वरित सामन्यांत दोन्ही संघाच्या खेळाडूंकडे सिद्ध करण्यासारखे बरेच असेल, असे मला वाटते.भारतीय संघाची एखादी कमजोर बाजू हेरून वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न आॅसीने अनेकदा केला. मात्र, भारताच्या शिलेदारांनी संघाला अडचणीच्या स्थितीतून केवळ सहीसलामत बाहेर काढले नाही, तर कांगारूंवर बाजी उलटवून सहज सामने जिंकले. ही कामगिरी चॅम्पियन संघाला साजेशी अशीच म्हणायला हवी. उर्वरित दोन लढतींत विजयाचा हा आलेख कायम ठेवून आॅस्ट्रेलियाविरूद्ध चॅम्पियन संघाप्रमाणे वर्चस्व गाजवायला हवे. प्रतिस्पर्ध्यांना अजिबातही संधी न देणे, हे चॅम्पियन संघाचे महत्त्वाचे लक्षण असते. याआधी भारताने श्रीलंकेचा सुपडा साफ केला. खेळाडूंचा फॉर्म बघता आॅस्ट्रेलियाचा ५-०ने धुव्वा उडविण्याची सुवर्णसंधी टीम इंडियाला आहे, असे झाल्यास तो कांगारूंसाठी मोठा घाव असेल. मालिकेतील सर्वच सामने जिंकल्यास प्रतिस्पर्धी संघ पुरता हतबल होते. कांगारूंनी अनेक वर्षे याच पद्धतीने प्रतिस्पर्ध्यांची शिकार करून जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजविले. भारताकडेही ही संधी आहे. कर्णधार विराट कोहलीनेही नेतृत्व स्वीकारल्यावर आॅस्ट्रेलियाप्रमाणे मालिकांत निर्विवाद यश मिळविण्याचा मनोदय व्यक्त केला होता. या मार्गावर वाटचाल करण्यासाठी भारताला उर्वरित दोन्ही सामने याआधीच्या सामन्यांप्रमाणे गंभीरतेने खेळावे लागतील.बंगळुरू व नागपूरमधील दोन लढतींसाठी भारतीय संघांत काही बदल झाल्यास नवल नाही. संघात दोन किंवा तीन नवे चेहरे असू शकतील. पण यामुळे संघाच्या खेळण्याच्या पद्धतीत आणि क्षमतेत फरक पडू नये. उर्वरित लढतींतही वर्चस्व राखणे, हेच यजमान संघाचे ध्येय हवे. दुसरीकडे, मालिका गमावली असली तरी आॅस्ट्रेलिया उर्वरित दोन सामने जिंकून उभारी घेण्याच्या प्रयत्नात असेल. चेन्नइतील पहिल्या सामन्यात आॅसी गोलंदाजांनी भारताची अवस्था ३ बाद ११ आणि नंतर ५ बाद ८७ अशी केली होती. कोलकत्यात पाहुण्यांनी भारताला अडीचशेच्या घरात रोखले. इंदूरमध्ये झालेल्या तिसºया लढतीत कांगारूंनी १ बाद २२४ अशी जबरदस्त सुरूवात केली होती. मात्र, तिन्ही वेळा भारतीय खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांचे वर्चस्व मोडित काढून सामन्यांचा निकाल फिरवला. नेमकी हीच बाब आॅस्ट्रेलिया संघांतील खेळाडूंच्या मनोधैर्यावर आघात करणारी ठरली. याचा फायदा घेऊन भारताने ही मालिका ५-० अशी न जिंकणे निराशाजनक असेल. भारताने आधीच्या तीन लढतींप्रमाणे खेळ केल्यास मालिकेचा निकाल आपल्या सर्वांच्या अपेक्षेनुसार ५-० असाच बघायला मिळेल, हे नक्की. त्यादृष्टीने उर्वरित दोन लढतींबाबत उत्सुकता आहे. (पीएमजी)

टॅग्स :क्रिकेट