Join us  

भारताविरुद्ध ‘क्लीन स्विप’साठी उत्सुक - रबाडा

भारताविरुद्धच्या मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्याच्या पाच दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाने यजमान संघ ३-० ने ‘क्लीन स्विप’ नोंदवण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 4:03 AM

Open in App

जोहान्सबर्ग : भारताविरुद्धच्या मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्याच्या पाच दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाने यजमान संघ ३-० ने ‘क्लीन स्विप’ नोंदवण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेने मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकून २-० ने विजयी आघाडी घेतली आहे.रबाडा म्हणाला,‘वेगवान खेळपट्टीवर कसे खेळायचे याची आम्हाला कल्पना आहे. आम्हाला त्यांच्या आक्रमणाचा आदर करायला हवा. तुम्ही प्रत्येक लढतीत विजय मिळवण्यास उत्सुक असता. आम्ही भारताला ‘क्लीन स्विप’ देण्यास उत्सुक आहोत.’रबाडा म्हणाला, ‘भारतीय संघ कर्णधार विराट कोहलीवर अपेक्षेपेक्षा अधिक अवलंबून आहे. त्यात काही वावगे नाही. आमचाही काही खेळाडूंवर अधिक विश्वास असतो. मला असे म्हणायचे नाही की, भारतात चांगले खेळाडू नाहीत. भारतीय संघात चांगले खेळाडू आहेत, पण खरे बघता जास्तीत जास्त धावा कोहलीच करतो. कोहलीसारख्या फलंदाजाला गोलंदाजी करताना आनंद मिळतो. त्याला आयसीसीने वर्षातीलसर्वोत्तम खेळाडू घोषित केले आहे. सर्वोत्तम खेळाडूला आव्हान देणे चांगले असते.’रबाडा पुढे म्हणाला,‘भारताच्या वेगवान गोलंदाजांनी आमच्या संघापुढे कडवे आव्हान सादर केले आहे. वेगवान गोलंदाज वांडरर्समध्ये गोलंदाजी करण्यास उत्सुक आहेत. कारण येथील खेळपट्टीवर वेग, उसळी व स्विंग सर्वकाही असते. भारतीय संघातही चांगले गोलंदाज आहेत. जसप्रीत बुमराह दर्जेदार गोलंदाज असून तो आता भारताचा आघाडीचा गोलंदाज झाला आहे. मोहम्मद शमी व उमेश यादव अनुभवी असून त्यांच्याकडे वेग आहे. भुवनेश्वर कुमारने केपटाऊनमध्ये आमच्या संघावर वर्चस्व गाजवले होते.’ (वृत्तसंस्था)खेळपट्टीबाबत बोलताना रबाडा म्हणाला, ‘मी अद्याप खेळपट्टी बघितलेली नाही. सध्या आम्ही क्रिकेटबाबत अधिक विचार करीत नाही. सोमवारपासून आम्ही सरावास सुरुवात करू. त्यानंतर खेळपट्टी बघू . आम्हाला येथील परिस्थितीची कल्पना आहे. गेल्या वेळी भारतीय संघाने येथे चांगला खेळ केला होता. कोहलीने शतक ठोकले होते. वांडरर्सची खेळपट्टी चांगली असते. तेथे चेंडू स्विंग होतात. येथील खेळपट्टीवर वेळ घालविला तर धावाही वसूल करता येतात. जर चांगला मारा केला तर विकेटही घेता येतात.’

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८