कोलकाता : सध्या भारतीय संघाबाहेर असलेल्या अष्टपैलू सुरेश रैनाला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आपली काय किंमत आहे, याची चांगली कल्पना आहे. त्याने खरा क्रिकेटपटू होण्याचे श्रेय चेन्नई सुपरकिंग्सला (सीएसके) दिले आहे.
सोमवारी बंगालविरुद्ध नाबाद १२६ धावांची खेळी करणारा ३१ वर्षीय कर्णधार रैना आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने (१६१) व सर्वाधिक धावा (४५५०) फटकाविणारा खेळाडू आहे. त्याने १३९.०९ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. त्यामुळे सीएसकेचा महेंद्रसिंह धोनी व अष्टपैलू रवींद्र जडेजा यांच्यासह त्याला रिटेन करण्याचा निर्णय आश्चर्यचकित करणारा नाही.
सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेतील लढतीच्या निमित्ताने येथे आलेला रैना म्हणाला, ‘आम्ही एकत्र बरेच सामने खेळले आहेत. त्यामुळे सीएसकेतर्फे आम्हाला पुन्हा संधी मिळणार असल्याचे अपेक्षित होते. मी चेन्नईमध्येच खरा खेळाडू झालो.’
गेल्या दोन मोसमांत गुजरात लायन्सचे नेतृत्व केल्यानंतर चेन्नई संघात परलेला रैना म्हणाला, ‘मॅथ्यू हेडन, मायकल हसी, मुथय्या मुरलीधरन यांच्यासारख्या प्रशिक्षकांचा माझ्यावर चांगला प्रभाव राहिला आहे. मला त्यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळाले. हा संघ नसून कुटुंब आहे.’(वृत्तसंस्था)
हा डावखुरा फलंदाज आयपीएलच्या पुढच्या सत्रासाठी पुन्हा सीएसकेची जर्सी परिधान करण्यासाठी आणखी प्रतीक्षा करू शकत नाही.
रैनासाठी राष्ट्रीय संघातील स्थान गमावण्यासाठी
फिटनेस हा एक मुद्दा राहिला आहे. तो दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून भारताच्या वन-डे आंतरराष्ट्रीय संघातून बाहेर आहे. यापूर्वी तो टीम इंडियातर्फे इंग्लंडविरुद्ध गेल्या वर्षी टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.