Join us  

'या' क्रिकेटपटूंवरही त्याच्या पत्नीविषयी स्लेजिंग केलं होतं

सध्या क्रिकेट विश्वात डेव्हिड वार्नर आणि क्विंटन डी कॉक यांच्यातील स्लेजिंगचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. पण यापूर्वीही काही क्रिकेटपटूंवरही त्याच्या पत्नीविषयी स्लेजिंग केलं होतं. त्या आठवणी पुन्हा एकदा डोळ्यापुढे तरळून गेल्या.

By प्रसाद लाड | Published: March 09, 2018 1:53 PM

Open in App
ठळक मुद्देसारवानने जे उत्तर दिले त्यानंतर मॅग्रा त्याच्या अंगावर धावून गेला होता.

प्रसाद लाड : क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ.  पण ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू आक्रमक. त्यांच्यासाठी स्लेजिंग हा खेळाचाच एक भाग. पण जेव्हा प्रतिस्पर्धी त्यांच्याबद्दल स्लेजिंग करतं, तेव्हा ते त्यांच्या पचनी पडत नाही. सध्या क्रिकेट विश्वात डेव्हिड वार्नर आणि क्विंटन डी कॉक यांच्यातील स्लेजिंगचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. पण यापूर्वीही काही क्रिकेटपटूंवरही त्याच्या पत्नीविषयी स्लेजिंग केलं होतं. त्या आठवणी पुन्हा एकदा डोळ्यापुढे तरळून गेल्या.

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दरबान येथील पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी वार्नर आणि डी कॉक यांच्यामध्ये वाद झाला होता. सामना संपल्यावर वार्नर तर डी कॉकवर धावून गेला होता. याप्रकरणी वार्नर आणि डी कॉक या दोघांवरही आयसीसीने कारवाई केली. डी कॉकने माझ्या पत्नीविषयी स्लेजिंग केल्याचे वक्तव्य वार्नरने केले आहे. पण यापूर्वीही अशा घटना क्रिकेट विश्वात घडलेल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू रॉड मार्श आणि इंग्लंडचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इयान बोथाम यांच्यामध्येही पत्नीविषयीचे स्लेजिंग करण्यात आले होते. मार्श यांनी एका सामन्यादरम्यान बोथम यांना खोचकपणे विचारले होते. ते बोथमला म्हणाले की, "तुझी बायको आणि माझी मुलं कशी आहेत?" यावर बोथम यांनीही तोडीसतोड उत्तर दिलं होतं. ते म्हणाले की, "बायको तर चांगली आहे, पण मुलं मंदबुद्धी आहेत." यानंतर मार्श यांनी बोथमशी संवाद सोडला होता.ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ग्लेन मॅग्राने झिम्बाब्वेच्या इडो ब्रँडीसवरही एकदा टीका केली होती. पण इडोने त्याला चोख उत्तरही दिले होते. मॅग्रा ईडोला म्हणाला की, "तु एवढा जाडा का आहेस?" त्यावर इडोने त्याची बोलती बंदी केली होती. इडो म्हणाला की, "मी जास्त वेळ तुझ्या बायकोबरोबर व्यतित करत असतो, ती मला नेहमीच बिस्कीटं खायला देते."

मॅग्रा हा महान गोलंदाज असला तरी स्लेजिंगमध्येही जास्त रमायचा. वेस्ट इंडिच्या खेळाडूला एकदा केलेलं स्लेजिंग त्याला चांगलेच भोवले होते. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये कसोटी सामना होता. त्यावेळी ब्रायन लारा हा वेस्ट इंडिजचा कर्णधार होता आणि त्या सामन्यात तो लवकर बाद झाला होता. पण त्यानंतर वेस्ट इंडिजचा रामनरेश सारवान हा चांगली फलंदाजी करत होता. त्याच्या फलंदाजीला वैतागून मॅग्रा सारवानला म्हणाला की, "तुमचा कर्णधार लवकर बाद झाला. तो बेडवर निवस्त्र पहुडलेला कसा दिसतो?" त्यावर सारवानने जे उत्तर दिले त्यानंतर मॅग्रा त्याच्या अंगावर धावून गेला होता. सारवान त्याला म्हणाला की, "लारा हा बेडवर पहुडलेला कसा दिसतो, हे सर्वात चांगले तुझी बायकोच सांगू शकेल." हे ऐकल्यावर मॅग्रा लालबुंद झाला होता.दुसऱ्याची खोड काढायची ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची जुनी सवय आहे. पण त्यांची हीच सवय त्यांच्या अंगलटही आली आहे.

टॅग्स :क्रिकेटडेव्हिड वॉर्नरक्विन्टन डि कॉक