नवी दिल्ली : शालेय क्रिकेटपटूंसाठी अधिक संधी निर्माण करून देण्याच्या उद्देशाने भारतीय शालेय क्रीडा संघटनेच्या (एसजीएफआय) वतीने २० शहरांत तीनदिवसीय निवड चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. निवडकर्त्यांच्या देखरेखीखाली पार पडणाऱ्या या शिबिरातून निवड झालेल्या खेळाडूंना राष्ट्रीय शालेय क्रिकेट लीग (एनएससीएल) स्पर्धेच्या पहिल्या सत्रात खेळण्याची संधी मिळेल. या वेळी प्रत्येक खेळाडू आपल्या शहराचे प्रतिनिधित्व करेल.
१२ ते १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी आयोजिण्यात आलेले हे निवड चाचणी शिबिर मुंबई, पुणे, लखनऊ, कानपूर, आग्रा, हरियाना, हैदराबाद, चंदीगड, दिल्ली, डेहराडून, बंगळुरु, कोलकाता, रांची, गुवाहाटी, अहमदाबाद, चेन्नई, नोएडा, इंदूर, वाराणसी आणि अलाहाबाद अशा २० शहरांमध्ये रंगेल. प्रत्येक शहरातून १६ खेळाडूंची निवड करण्यात येणार असून चार खेळाडू राखीव म्हणूनही निवडण्यात येणार असल्याची माहिती, एसजीएफआयच्या वतीने एका पत्रकाद्वारे देण्यात आली.