Join us  

क्रिकेट : प्रो वर्ल्ड टॅलेंट अकादमीला विजेतेपद

अर्णव सक्सेना सर्वोत्तम 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 6:34 PM

Open in App

मुंबई, २८ नोव्हेंबर: प्रो वर्ल्ड टॅलेंट अकादमी संघाने दिलीप वेंगसरकर फौंडेशनच्यावतीने माहूल येथे आयोजित केलेल्या आय.डी.बी.आय. फेडरल इन्शुरन्स कप या १२वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपदाचा मान मिळविला. अंतिम फेरीच्या लढतीत त्यांनी टोटल वेंगसरकर अकादमी संघावर ४३ धावांनी विजय मिळवून विजेतेपदाचा चषक पटकावला.

प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेल्या प्रो वर्ल्ड टॅलेंट अकादमी संघाने निर्धारित २१ षटकात ४ बाद १२३ धावा केल्या. तनिष शेट्टी याची ३० चेंडूतील ३९ धावांची खेळी आणि सौरीश देशपांडे नाबाद १८ व वरद साखरकर १७ यांच्या उपयुक्त फलंदाजीमुळे त्यांनी ही मजल मारली. वेंगसरकर अकादमीच्या दर्शन राठोड याने २९ धावांत २ बळी मिळविले.

या आव्हानाचा पाठलाग करताना टोटल वेंगसरकर अकादमीला २१ षटकात ८ बाद ८० धावांचीच मजल मारता आली. हर्ष पाटील (१७) आणि हर्ष गायकर (१६) यांचा अपवाद वगळता त्यांचे अन्य फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाहीत. अग्स्थ्या बंगेरा याने १४ धावांत २ बळी मिळविले. अंतिम फेरीतील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनतनिष शेट्टी याची निवड करण्यात आली. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून प्रो वर्ल्ड टॅलेंट अकादमीचा अर्णव सक्सेना याची निवड करण्यात आली. स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज म्हणून अभिग्यान कुंडू (अविनाश साळवी फौंडेशन), सर्वोत्तम गोलंदाज म्हणून दर्शन राठोड (टोटल वेंगसरकर अकादमी) आणि सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून अनिरुद्ध नायर (टोटल वेंगसरकर अकादमी) यांना गौरविण्यात आले. भारताचे माजी कर्णधार दिलीपवेंगसरकर उपस्थित होते. यावेळी बोलताना वेंगसरकर यांनी छोट्या खेळाडूना रनिंग बिटवीन द विकेटवर अधिक मेहनत घेण्याचा सल्ला दिला तसेच प्रशिक्षकांनी याच वयात या खेळाडूकडून या गोष्टीचाअधिक सराव करून घेण्याची गरज असल्याचे सांगितले.

 संक्षिप्त धावफलक - प्रो वर्ल्ड टॅलेंट अकादमी- २१ षटकात ४ बाद १२३ (वरद साखरकर १७, तनिष शेट्टी ३९, सौरीश देशपांडे नाबाद १८, अगस्थ्या बंगेरा नाबाद १४; दर्शन राठोड २९/२) वि.वि. टोटल वेंगसरकर अकादमी – २१ षटकात ८ बाद ८०(हर्ष पाटील १७, हर्ष गायकर १६; अगस्थ्या बंगेरा १४/२).

टॅग्स :मुंबई