Join us  

CoronaVirus: कोरोनामुळे क्रिकेटमध्ये होणार अनेक बदल

एक वेळेस चेंडूला थुंकी लावण्यावर मर्यादा आणता येईल, पण घामाचे काय. घाम तर येतच राहणार. एक यष्टिरक्षक सोडला तर सर्व खेळाडू ग्लोव्हज्विना खेळतात. चेंडू पास करताना संक्रमण कसे रोखणार? हाही प्रश्न आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 3:02 AM

Open in App

- अयाझ मेमन, कन्सल्टिंग एडिटरकालच सचिन तेंडुलकरचा ४७ वा वाढदिवस साजरा झाला. मला अजूनही ३१ वर्षांपूर्वीची सचिनसोबत झालेली पहिली भेट आठवते. त्या वेळी तो १६ वर्षांचाही झाला नव्हता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने पहिला मोसम खेळला होता.रणजी ट्रॉफी, दुलिप ट्रॉफी आणि इराणी ट्रॉफी या तिन्ही स्पर्धांमध्ये पदार्पणातच शतक झळकावण्याचा पराक्रम त्याने केला होता. मुंबईतील मरिन ड्राइव्ह येथील हिंदू जिमखाना येथे झालेली सचिनसोबतची ती पहिली भेट आजही चांगलीच लक्षात आहे. अभिनेता टॉम वॉल्टर याच्यासह सचिनची मुलाखत घेण्यात येणार होती. त्या वेळी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सचिनची भारतीय संघात निवड व्हावी अशी अनेकांची मागणी होती. पण तसे झाले नाही, त्या वेळी कर्णधार होते दिलीप वेंगसरकर. त्या वेळी सचिनचा फॉर्म जबरदस्त होता, पण तरीही त्याची संघात निवड झाली नव्हती. याचे कारण राजसिंग डुंगरपूर यांनी दिले होते की, त्या वेळी विंडीजकडे आग ओकणारे गोलंदाज होते आणि त्यांच्याविरुद्ध सचिनला दुखापत होण्याची भीती होती. यामुळे त्याची कारकीर्दही सुरुवातीलाच संपुष्टात आली असती.पण असे झाले नाही आणि त्यानंतर जे काही घडले तो सर्व इतिहास क्रिकेटविश्वाने अनुभवला आहे. आता वळूया विद्यमान क्रिकेटकडे. नुकतीच आयसीसीची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. कोरोनामुळे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे वेळापत्रक बिघडलेले असताना ही बैठक अत्यंत महत्त्वाची होती. यामध्ये आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेबाबतची चर्चा सर्वांत महत्त्वाची होती. अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही; मात्र पुढील कार्यक्रम २०२३ सालापर्यंत पुन्हा आयोजित करता येऊ शकतात, असे या बैठकीत म्हटले गेले. त्याचप्रमाणे यंदा टी-२० विश्वचषक स्पर्धा रद्द करावी लागेल किंवा पुढे ढकलावी लागेल, असेही सांगण्यात आले. कारण ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी आता पुरेसा वेळ उरलेला नाही. त्याचबरोबर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे काय होणार, यावरही लक्ष द्यावे लागेल. कारण २०२१ साली या स्पर्धेचा अंतिम सामना होणार होता. पण सध्याच्या परिस्थितीमुळे स्पर्धेतील उर्वरित सामने झाले नाहीत, तर कशाच्या आधारे अंतिम सामना खेळविण्यात येईल, यावरही चर्चा रंगत आहे. याशिवाय कोरोना विषाणू गेल्यानंतरही अनेक गोष्टींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये गोलंदाजांनी चेंडूवर थुंकी लावावी की नाही, यावरही गंभीर चर्चा होत आहे.यामध्ये एक सल्ला असाही आला की, प्रेक्षकांविना सामने खेळवावेत. पण असे जरी केले, तरी किती लोकांना ते रोखणार, असाही प्रश्न आहे. त्यामुळे मला वाटते की, या सर्व अडचणी रोखण्यासाठी कोरोनावर ठोस औषध मिळायला पाहिजे. त्याशिवाय या समस्या कधीही संपणार नाहीत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यासचिन तेंडुलकर