चेन्नई : कोरोना व्हायरसमुळे झालेले लॉकडाऊन क्रिकेटपटूंसह सर्व खेळाडूंसाठी मोठे आव्हान आहे, पण त्याचसोबत हा कालावधी लक्ष्याचे नव्याने आकलन करणे व शारीरिक व मानसिक स्थिती चांगली करण्यासाठी गुंतवणूक करण्याची संधीही आहे, असे मत माजी भारतीय फलंदाज एस. ब्रदिनाथने व्यक्त केले.
कोरोना व्हायरसची आतापर्यंत जगभरात ४१ लाखांपेक्षा अधिक लोकांना लागण झाली आहे तर जवळजवळ तीन लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जगभरात जवळजवळ सर्वच खेळ ठप्प आहेत.
बद्रिनाथ म्हणाला, ‘हा सर्व खेळाडूंसाठी आव्हानात्मक कालावधी आहे. यावेळी त्यांनी खेळत असायला हवे होते. त्यांनी आपले लक्ष्य निश्चित केले होते. त्यांना आता लक्ष्याचे नव्याने आकलन करण्याची संधी मिळाली आहे.
भारतातर्फे दोन कसोटी व सात वन-डे आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा ३९ वर्षीय बद्रिनाथ म्हणाला, ‘ब्रेकदरम्यान खेळाडूंना छोट्या-मोठ्या दुखापतीतून सावरण्याची संधी आहे. त्यांना शरीर व मानसिक कौशल्यावर मेहनत घेण्याचीही संधी मिळाली आहे. (वृत्तसंस्था)