- रोहित नाईक
सध्या सोशल मीडियावर मुंबईच्या युवा क्रिकेटपटूंचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून यामध्ये या क्रिकेटपटूंनी देशवासियांना कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी घरीच थांबण्याचा संदेश दिला आहे. अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, धवल कुलकर्णी, शार्दुल ठाकूर, आदित्य तरे, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, सिध्देश लाड आणि सरफराझ खान या क्रिकेटपटूंनी संदेश दिला आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी घरीच राहणे आपल्या हिताचे असून मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करुन सर्वांनी आपल्या प्रियजनांसोबत आनंदाने वेळ व्यतित करा, असा संदेश या व्हिडिओतून देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, जबाबदार नागरिक म्हणून सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे आणि निर्देशांचे पालन करणे आपली जबाबदारी आहे, असाही संदेश क्रिकेटपटूंनी दिला आहे.
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने म्हटले की, ‘मी सध्या घरीच असून माझ्या कुटुंबासमवेत खूप चांगला वेळ व्यतित करत आहे. वाचनाचा छंद पूर्ण करत आहे आणि सरकारने दिलेल्या नियमांचे पूर्ण पालन करतोय. आशा आहे की, तुम्ही सुद्धा या नियमांचे पालन करत असाल. सर्वांनी घरीच रहा, सुरक्षित रहा.’
तसेच, ‘सर्वांना विनंती आहे की, तुम्ही घरीच रहा. कारण हे सर्व काही आपल्याच सुरक्षेसाठी असून दिलेल्या सर्व निर्देशांचे योग्य पालन करा,’ असा संदेश युवा फलंदाज श्रेयस अय्यर याने दिला. मुंबईचा ‘संकटमोचक’ असलेला सिध्देश लाड याने सांगितले की, ‘सरकारने दिलेल्या सर्व नियमांचे मी पालन करतोय आणि घरीच थांबून तंदुरुस्ती कायम राखण्याचा प्रयत्न करतोय, तुम्हीही घरीच थांबा. सुरक्षित रहा.’
मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) अॅपेक्स कौन्सिल सदस्य अजिंक्य नाईक यांच्या पुढाकाराने हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे.
...म्हणून ब्लॅक अॅण्ड व्हाईट व्हिडिओ
क्रिकेटपटूंचा हा पूर्ण व्हिडिओ ब्लॅक अॅण्ड व्हाईट असल्याने थोडे आश्चर्य वाटते. मात्र यामागचे कारण विचारले असता अजिंक्य नाईक यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ‘आज सगळेजण आपापल्या घरी थांबलेत. कोरोनाविरुद्ध सर्वांचा संघर्ष सुरु आहे. बाहेरचे जग जरी रंगीत दिसत असले, तरी मनामधून प्रत्येकाच्या आयुष्यातील रंग काहीसे नाहीसे झाले आहेत. त्यामुळेच ही व्हिडिओ ब्लॅक अॅण्ड व्हाईटमध्ये तयार करण्यात आली. परंतु, लवकरची परिस्थिती सुधारेल याची खात्री आहे. आपण सर्व मिळून नक्कीच कोरोनावर विजय मिळवू.’