मेलबोर्न : अॅलिस्टर कूकच्या विक्रमी द्विशतकी खेळीमुळे इंग्लंडने आॅस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या अॅशेस कसोटीच्या तिस-या दिवशी पहिल्या डावात १६४ धावांच्या आघाडीसह सामन्यावर वर्चस्व मिळविले आहे.
कूकच्या नाबाद खेळीमुळे इंग्लंडने पहिल्या डावात ९ बाद ४९१ धावा उभारल्या. जेम्स अॅन्डरसन दुस-या टोकावर त्याला साथ देत असून त्याने खाते मात्र उघडले नाही. आॅस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३२७ धावा केल्या. याआधीचे तिन्ही सामने जिंकून मालिका ३-० अशी जिंकलेल्या आॅस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना धावांवर आवर घालणे कठीण गेले. स्टुअर्ट ब्रॉड याने कूकची समर्थ साथ देत नवव्या गड्यासाठी ११० चेंडूत शतकी भागीदारी केली. इंग्लंडने आज २९९ धावांच्या मोबदल्यात सात फलंदाज गमविले.
कर्णधार ज्यो रुट याने कूकसह १३८ धावांची भागीदारी केली. डेव्हिड मालन १४ धावांवर बाद झाला. जॉनी बेयरेस्टॉ २२ आणि मोईन अली २० हे दुसºया सत्रातत बाद झाले. चहापानानंतर ख्रिस व्होक्स (२६) व पदार्पण करणारा टॉम कूरेन (४) यष्टिरक्षकाकरवी झेलबाद झाले.
>कूकने मोडला रिचर्डस्चा विक्रम
मालिकेत पहिल्या तिन्ही कसोटीत मोठी खेळी करण्यात अपयशी ठरलेल्या कूकने ४०९ चेंडू टोलवून २७ चौकारांसह २४४ धावा ठोकल्या. या खेळीमुळे कूक मेलबोर्न मैदानावर सर्वाधिक धावा ठोकणारा विदेशी खेळाडू बनला. त्याने विव्हियन रिचर्डस्चा १९८४ मध्ये नोंदविलेला २०८ धावांचा विक्रम मोडित काढला.
१९२८ साली इंग्लंड संघाकडून २०० धावा ठोकणारे वाली हॅमन्ड यांचा विक्रमही अॅलिस्टर कूकने यावेळी मागे टाकला. या खेळीमुळे तो सर्वाधिक धावा काढणाºया फलंदाजांच्या यादीत सहाव्या स्थानावर आला. कारकिर्दीतील १५१ वी कसोटी खेळत असलेल्या कूकच्या नावावर आता कसोटी सामन्यात एकूण ११,९५६ धावा आहेत.
>धावफलक
आॅस्ट्रेलिया पहिला डाव : ३२७,
इंग्लंड पहिला डाव : १४४ षटकांत ९ बाद ४९१ धावा (अॅलिस्टर कूक खेळत आहे २४४,ज्यो रुट ६१, स्टुअर्ट ब्रॉड ५६, ख्रिस व्होक्स २६, जॉनी बेयरेस्टॉ २२, मोईन अली २०. हेजलवूड ३/९५, लियोन ३/१०९, कमिन्स ३/११७.)