Join us  

आयपीएल लिलावात दुर्लक्षित कॉनवेची शानदार फटकेबाजी; न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलियावर ५३ धावांनी विजय

टी-२० मध्ये न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलियावर ५३ धावांनी विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 12:43 AM

Open in App

ख्राईस्टचर्च : डेवोन कॉनवेच्या ५९ चेंडूतील शानदार ९९ धावाच्या जोरावर न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा पहिल्या टी-२० सामन्यात सोमवारी ५३ धावांनी पराभव केला. द.आफ्रिकेत जन्मलेल्या कॉनवेची झटपट प्रकारात ही सर्वाेच्च खेळी ठरली. न्यूझीलंडची २ बाद ११ अशी अवस्था असताना कॉनवेने खेळपट्टीवर पाय ठेवला. त्याच्या नाबाद खेळीमुळे नाणेफेक जिंकून फलंदाजी घेणाऱ्या न्यूझीलंडने ५ बाद १८४ अशी मजल गाठली.

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा डाव १७.३ षटकात १३१ धावात संपुष्टात आला. पाच सामन्याच्या मालिकेत न्यूझीलंडने १-० अशी आघाडी घेतली आहे. दहा चौकार आणि तीन षटकार खेचणाऱ्या कॉनवेने डावाच्या अखेरच्या षटकात चौकार आणि षटकार खेचला खरा, मात्र एका धावेने त्याचे शतक हुकले. न्यूझीलंडला सुरुवातीला ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम्स, फाय रिचर्डसन आणि केन रिचर्डसन यांनी धक्के दिले. कॉनवेने मात्र पडझड थोपविली.

मार्टिन गुप्तिल आणि कर्णधार केन विलियम्सन हे लवकर बाद झाले. टिम सिफर्ट एक धाव काढून माघारी फिरला. यानंतर कॉनवेने ग्लेन फिलिप्स(३०)सोबत चौथ्या गड्यासाठी ७४ आणि जिम्मी निशामसोबत (२६)पाचव्या गड्यासाठी ४७ तसेच मिशेल सॅंटेनरसोबत (७) सहाव्या गड्यासोबत ४४ धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियानेदेखील पहिले दोन फलंदाज आठ धावात गमावले. कर्णधार ॲरोन फिंच (१) आणि जोश फिलिप(२) हे लवकर बाद झाले. कॉनवेने दोघांचेही झेल घेतले. मिशेल मार्श(४५)याने सावरण्याचा प्रयत्न केला. 

कॉनवेकडे दुर्लक्ष

डेवोन कॉनवे प्रथम श्रेणीत आठ वर्षे द. आफ्रिकेसाठी खेळला. २०१७ ला तो न्यूझीलंडमध्ये आला. मे २०२०मध्ये न्यूझीलंड क्रिकेटने त्याला मध्यवर्ती करारात स्थान दिले. नोव्हेंबर २०२० मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध तो पहिला टी-२० सामना खेळला होता. सुपर स्मॅश टी-२० त नाबाद ९३, नाबाद ९१, ६९ आणि ५० धावा ठोकल्या आहेत. टी-२० ते त्याने १५७ च्या सरासरीने कॉनवेने २७३ धावा केल्या आहेत. त्यात पाच अर्धशतकांचाही समावेश आहे. राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूने १४ कोटी २५ लाख खर्चून स्वत:च्या संघात घेतलेला ग्लेन मॅक्सवेल आजच्या सामन्यात एक धाव काढून बाद झाला.

टॅग्स :न्यूझीलंड