Join us  

स्पर्धात्मक क्रिकेट मान्सूननंतरच शक्य- सीईओ राहुल जोहरी

खेळाडूंची सुरक्षा सर्वतोपरी असून कोरोना महामारीच्या अभूतपूर्व संकटकालावधीत सर्वोत्तम पर्याय निवडण्याचा निर्णय खेळाडूंवर सोपवावा लागेल, असा पुनरुच्चारदेखील जोहरी यांनी केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 1:16 AM

Open in App

नवी दिल्ली : यंदा इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या पर्वाबाबत बीसीसीआय आशावादी असल्याची माहिती बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी गुरुवारी दिली. मान्सून आटोपल्यानंतरच स्पर्धात्मक क्रिकेटला सुरुवात होऊ शकेल, असेही ते म्हणाले. खेळाडूंची सुरक्षा सर्वतोपरी असून कोरोना महामारीच्या अभूतपूर्व संकटकालावधीत सर्वोत्तम पर्याय निवडण्याचा निर्णय खेळाडूंवर सोपवावा लागेल, असा पुनरुच्चारदेखील जोहरी यांनी केला आहे.‘टष्ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी’ मीडियातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये जोहरी म्हणाले, ‘२५ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर या काळात आयपीएल २०२० चे आयोजन करण्याचा विचार बीसीसीआय करीत आहे. गेल्या वर्षी देशभरात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जितक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, त्यापेक्षा जास्त लोकांनी आयपीएलचा आस्वाद घेतला. प्रायोजकांसाठी क्रिकेट हाच नेता आहे आणि तोच त्यांना मार्ग दाखवतो. इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा क्रिकेटमुळे जनजीवन सुरळीत होण्यास लवकर मदत होईल. जगभरातील खेळाडू लीगमध्ये खेळतात, हीच आयपीएलची मजा आहे. आयोजनाचे हे महत्त्व टिकविण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. कोरोनातून जगाला आणि देशाला सावरण्यासाठी थोडा वेळ लागेल यात वादच नाही. ही एका दिवसात होणारी प्रक्रिया नक्कीच नाही.’‘जेव्हा विमानसेवा सुरू होईल तेव्हा, स्पर्धा सुरू होण्याआधी प्रत्येकाला स्वत:ला क्वारंटाईन करावे लागेल. प्रत्येक खेळाडूचे वेळापत्रक कसे आहे, याबाबत माहिती घेऊनच त्यावर विचार करण्यात येईल. आम्ही सारे खूप आशावादी आहोत. आम्ही आशा करतो की पावसाळा संपेपर्यंत परिस्थिती सुधारलेली असेल. म्हणून आम्ही पावसाळ्यानंतर आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयपीएल आयोजनाचा विचार करीत आहोत,’ अशी माहिती जोहरी यांनी दिली. (वृत्तसंस्था)देशातील स्थानिक क्रिकेट सत्राच्या आयोजनादरम्यान आयपीएल आयोजन करण्याचे आव्हान मोठे असल्याचे जोहरी यांना वाटते. स्थानिक क्रिकेट सत्र आॅक्टोबर ते मे असे चालते. या कालावधीत दोन हजाराहून अधिक सामन्यांचे आयोजन केले जाते. बदलाच्या काळात स्थानिक क्रिकेटचा फेरविचार करण्याची गरज आहे. एखाद्या संघाला सामना खेळण्यासाठी ५० किमी तर दुसऱ्या संघाला ३ हजार किमी प्रवास करावा लागतो. सर्वच संघ प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध ‘होम अ‍ॅन्ड अवे’या तत्त्वावर सामने खेळतात. सद्यस्थितीत प्रवासबंदी कायम असल्याने लीगचे आयोजन करणे सोपे नाही. यावर चर्चा केल्यानंतर नवनवीन पर्याय पुढे आले. नाविन्य हे आगामी आयपीएलचे आकर्षण असेल.- राहुल जोहरी, सीईओ बीसीसीआय.

टॅग्स :बीसीसीआय