कोलकाता : येथे झालेल्या २३ वर्षांखालील सीके नायडू चषक क्रिकेट स्पर्धेत पश्चिम बंगालविरुद्ध उत्तर प्रदेशच्या शिवा सिंग याने ३६० अंशात फिरुन विचित्र पद्धतीने गोलंदाजी करत सर्वांनाच चकीत केले. त्याच्या या अजब गोलंदाजीने फलंदाजांसह पंचही चकीत झाले आणि नंतर पंचांनी शिवाचा हा चेंडू अवैध ठरविला. विशेष म्हणजे यंदा पृथ्वी शॉच्या नेतृत्त्वात १९ वर्षांखालील विश्वचषक पटकाणाऱ्या भारतीय संघात शिवाचा समावेश होता.
बंगालच्या दुसºया डावामध्ये शिवाने ३६० अंशामध्ये गोल फिरुन चेंडू टाकला. यावेळी चकीत झालेल्या फलंदाजाने हा चेंडू सावधपणे खेळला. तसेच हा चेंडू पंच विनोद सेशन यांनी अवैध (डेड बॉल) ठरवल्याने शिवासह त्याचे संघसहकारी गोंधळून गेले. पंचांच्या निर्णयाचा उत्तर प्रदेशच्या खेळाडूंनी विरोध केला आणि यानंतर खेळ थांबवला गेला.
या प्रकरणी पंच विनोद यांनी सहकारी पंच रवि शंकर यांच्याशी चर्चा केली. यानंतर त्यांनी शिवा आणि उत्तर प्रदेशचा कर्णधार शिवम चौधरी यांना सांगितले की, शिवा अशीच गोलंदाजी करत राहिला, तर पंच तो चेंडू अवैधच ठरवतील. या प्रकरणी एका क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना शिवाने म्हटले की, ‘मी एकदिवसीय आणि टी२० सामन्यांत वेगवेगळ्या पद्धतीने गोलंदाजी करतो. बंगालचे फलंदाज चांगली भागीदारी रचत होते. त्यामुळे मी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र पंचांनी चेंडू अवैध ठरविला. यावर मी त्यांना चेंडू अवैध का ठरविला असे विचारले.’
शिवा पुढे म्हणाला की, ‘मी केरळ संघाविरुद्धही ३६० अंशामध्ये गोल फिरुन गोलंदाजी केली होती. परंतु, त्यावेळी कोणालाच कसली समस्या आली नाही. फलंदाज नेहमी रिव्हर्स स्वीप किंवा स्विच हिट फटका मारतात. पण, जेव्हा गोलंदाज काही वेगळे करायला जातो, तेव्हा त्याचा चेंडू अवैध ठरविला जातो.’