Join us

शिखर धवन विरोधात आरोपपत्र दाखल, ६ फेब्रुवारीला होणार फैसला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन ( Shikhar Dhawan) याच्याविरोधात वाराणसी येथे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

By स्वदेश घाणेकर | Updated: January 28, 2021 12:24 IST

Open in App

भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन ( Shikhar Dhawan) याच्याविरोधात वाराणसी येथे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून काहीकाळ विश्रांतीवर असलेल्या धवननं नुकतीच वाराणसीला भेट दिली. वाराणसीत धवननं बाबा विश्वानाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले, त्यानंतर कालभैरव मंदिरात जाऊन विशेष अभिषेकही केला. अध्यात्मात तल्लीन झालेल्या धवननं गंगा किनारी जाऊन आरतीत सहभागी होण्याचा आनंदही घेतला होता. वाराणसीत नावेतून फिरतानाचे काही फोटो त्यानं पोस्ट केले होते आणि त्यात तो पक्ष्यांना दाणे खाऊ घालताना दिसत आहे. याच कृतीमुळे त्यानं स्वतःवर संकट ओढावून घेतलं आहे.

वकील सिद्धार्थ श्रीवास्तव यांनी वाराणसी कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणावर ६ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.  याआधी वाराणसी जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी त्या नाविकावर कारवाई होईल, असे सांगितले होते. त्या नाविकानं भारतीय क्रिकेटपटूला नियमांबद्दल सांगितले नसल्याचा दावा करण्यात आला आहे.  

नेमकं काय आहे प्रकरण?देशात बर्ड फ्लूचं सावट असताना पक्ष्यांना हाताळणं किंवा त्यांच्या संपर्कात येणे टाळावे असे प्रशासनाने बजावले आहे. तरीही धवनने पक्ष्यांना दाणे खाऊ घातले आणि त्यामुळे त्याच्यावर कारवाईची शक्यता आहे. धवननं इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केल्यानंतर स्थानिक प्रशासनाने त्वरित या प्रकरणाची माहिती घेतली. येथील स्थानिक प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार त्याच्यावर कारवाई होऊ शकते. 

कौशल राज शर्मा यांनी सांगितलं की, ''धवन नावेतून विहारासाठी गेला होता. त्यावेळी त्यानं काही पक्षांना खाऊ घातलं. बर्ड फ्लूचं संकट असल्यामुळे परदेशी पक्ष्यांना दाणे खायला घालण्यावर बंदी आहे. धवनने पोस्ट केलेल्या फोटोत तो पक्ष्यांना दाणे देताना दिसत आहे. याबाबतची चौकशी सुरू आहे आणि शिवाय त्या नाविकावरसुद्धा कारवाई केली जाणार आहे.'' 

टॅग्स :शिखर धवनवाराणसी