नवी दिल्ली : थंडीच्या हवामानामुळे होत असलेल्या अडचणीच्या कारणास्तव बीसीसीआयने भारत - श्रीलंका यांच्या दरम्यान होत असलेल्या आगामी तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील धर्मशाळा आणि पंजाब येथे होणारे पहिले दोन सामने निर्धारीत वेळेच्या दोन तास आधी सुरु करण्याचा निर्णय घेतला. या दोन सामन्यांच्या जाहीर करण्यात आलेल्या नव्या वेळापत्रकानुसार हे सामने सकाळी ११.३० वाजता सुरु होतील. यासंदर्भात बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी यांनी म्हटले की, ‘दोन्ही यजमान (पंजाब आणि धर्मशाळा) संघटनांशी केलेल्या चर्चेनंतर बीसीसीआयने आगामी एकदिवसीय मालिकेतील पहिले दोन सामन्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल केला आहे. १० डिसेंबरला धर्मशाळा येथे पहिला, तर १३ डिसेंबरला पंजाब येथे दुसरा एकदिवसीय सामना खेळविण्यात येणार आहे.
‘उत्तर भारतातील खराब हवामान लक्षात घेता यजमान संघाच्या विनंतीला मान देत हा निर्णय घेण्यात आला आहे,’ असेही चौधरी यांनी म्हटले. त्याचवेळी, विशाखापट्टनम येथे होणारा तिसरा एकदिवसीय सामना मात्र, निर्धारीत वेळेनुसार होणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.