Join us  

Chandrayaan-2 : हरभजन सिंगचा पाकिस्तानला सणसणीत टोमणा; म्हणाला...

 देशवासीयांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या इस्रोचे चांद्रयान-2 सोमवारी दुपारी 2.43 मिनिटांनी चंद्राच्या दिशेने झेपावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 1:48 PM

Open in App

नवी दिल्ली : देशवासीयांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या इस्रोचे चांद्रयान-2 सोमवारी दुपारी 2.43 मिनिटांनी चंद्राच्या दिशेने झेपावले. गेल्या रविवारी मध्यरात्री नियोजित असलेले चांद्रयान-2 चे प्रक्षेपण तांत्रिक कारणामुळे स्थगित करण्यात आल्याने इस्रोच्या शास्रज्ञांसह देशवासीयांच्या मनात चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र सोमवारी हे यान नियोजित कार्यक्रमाप्रमाणे चंद्राच्या दिशेने यशस्वीरीत्या झेपावले. त्यानंतर सर्व स्तरातून इस्रोचे कौतुक करण्यात आले. क्रिकेटपटूंसह अन्य क्षेत्रातील मान्यवरांनीही इस्रोचे अभिनंदन केले. पण, भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने 'चांद्रयान-२'च्या यशस्वी भरारीनंतर पाकिस्तानला सणसणीत टोमणा मारला.

हरभजन सिंगने ट्विट केले की,''काही देशांच्या झेंड्यांत चंद्र आहे, पण काही देश असे आहेत की ज्यांचे झेंडे चंद्रावर आहेत.'' भज्जीच्या या ट्विटमध्ये पाकिस्तान, अल्जेरीया, तुर्की, मालदीव, मॉरिटानिया, ट्युनिशिया, लिबिया, मलेशिया आणि अझरबैजानसह नऊ देशांचे झेंडे होते. तर चंद्रावर झेंडे फडकवणाऱ्या देशांत भारत, अमेरिका, चीन आणि रुस यांचा उल्लेख होता.  भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसह माजी फलंदाज सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग यांनीही इस्रोचे अभिनंदन केले.  श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून 'बाहुबली' रॉकेटच्या मदतीने चांद्रयान-2 यानाने  दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी यशस्वी उड्डाण केले. हे उड्डाण पाहण्यासाठी देशभरातून हजारो लोक आले होते. जवळपास 7500 लोकांनी ऑनलाईन बुकिंग केले होते. यासाठी इस्त्रोने 10000 लोक बसू शकतील अशी गॅलरी बनविली होती. दरम्यान, आजच्या यशस्वी उड्डाणानंतर चांद्रयान-2 काही दिवस पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करणास असून, त्यानंतर ते चंद्राच्या दिशेने रवाना होईल. तसेच 6 सप्टेंबर रोजी चांद्रयान चंद्रावर उतरेल. चांद्रयान 2 ला पृथ्वीच्या कक्षेत पोहोचविण्यासाठी इस्त्रोने शक्तीशाली रॉकेट जियोसिंक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हेईकल मार्क 3 (जीएसएलव्ही-एमके 3) वापर केला. या रॉकेटला स्थानिक प्रसारमाध्यमांनी 'बाहुबली' असे नवा दिले आहे. या रॉकेटचे वजन 640 टन असून रॉकेटची किंमत 375 कोटी रुपये आहे. या रॉकेटने 3.8 टन वजनाच्या चांद्रयान-2 या यानाला घेऊन उड्डाण केले. या यानाच्या निर्मितीचा खर्च 6.3 कोटी रुपये आहे. हे यान वेगवेगळे प्रवासाचे टप्पे पार करत 7 सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर उतरणार आहे. आतपर्यंत केवळ अमेरिका, रशिया आणि चीन या तीन देशांनीच यान चंद्रावर नेले आहे.

टॅग्स :चांद्रयान-2हरभजन सिंगपाकिस्तान