Join us  

मोटेरावर कारवाईची शक्यता कमीच

दुसरीकडे इंग्लंडविरुद्ध अखेरच्या तसेच चौथ्या कसोटी सामन्यासाठी फलंदाजांना अनुकूल खेळपट्टी बनवून आयसीसीला गोंजारण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न दिसतो. भारताने मालिकेत २-१ अशी आघाडी संपादन केली असून लॉर्ड्सवर १८ जूनपासून रंगणाऱ्या आयसीसी कसोटी मालिकेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळण्यासाठी चौथा कसोटी सामना किमान अनिर्णीत राखणे अनिवार्य असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 5:27 AM

Open in App

नवी दिल्ली : मोटेराच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर तिसरा कसोटी सामना अवघ्या दोन दिवसात संपला. दिवसरात्र कसोटीसाठी जी खेळपट्टी तयार करण्यात आली, त्यावरून चौफेर टीका सुरू झाली आहे. पण अधिकृत तक्रार झाली नसल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद मोटेरावर बंदीची कारवाई करेल, अशी शक्यता दिसत नाही. 

दुसरीकडे इंग्लंडविरुद्ध अखेरच्या तसेच चौथ्या कसोटी सामन्यासाठी फलंदाजांना अनुकूल खेळपट्टी बनवून आयसीसीला गोंजारण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न दिसतो. भारताने मालिकेत २-१ अशी आघाडी संपादन केली असून लॉर्ड्सवर १८ जूनपासून रंगणाऱ्या आयसीसी कसोटी मालिकेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळण्यासाठी चौथा कसोटी सामना किमान अनिर्णीत राखणे अनिवार्य असेल. यजमान संघ खेळपट्टीबाबत अतिरिक्त जोखीम पत्करू इच्छित नाही. त्यामुळे पुन्हा एकदा फिरकीला पोषक खेळपट्टी तयार होईल, असे दिसत नाही. इंग्लंड संघाने अद्याप कुठलीही अधिकृत तक्रार केली नाही, एकाच ठिकाणी चांगली आणि खराब खेळपट्टी असेल तर कारवाईची शक्यता क्षीण असते. चौथा सामना दोन्ही संघांसाठी उपयुक्त असल्यामुळे तुल्यबळ ठरेल, अशीच खेळपट्टी तयार करण्यावर बीसीसीआयचा भर असेल. गुलाबी चेंडूवर सामना चांगलाच झाला. अशा चेंडूवर रंगाचे कोटिंग चढविण्यात येत असल्याने खेळ पुढे सरकताच हा रंग निघतो. त्यानुसार चेंडू ‘स्कीड’ होत जातो. इंग्लंडच्या माजी खेळाडूंना खेळपट्टीत कुठलीही उणीव जाणवली नाही. आमचे फलंदाज सरळ चेंडूवर बाद झाले असे अनेकांचे मत आहे.’

मोटेरासारखी खेळपट्टी कसोटी क्रिकेटसाठी खराब : वेंगसरकर

मुंबई : ‘मोटेराची खेळपट्टी अत्यंत निकृष्ट दर्जाची होती, यात शंका नाही. चाहते पैसे खर्च करून सामना पाहण्यासाठी येतात, असे सांगून अशा प्रकारच्या खेळपट्ट्या कसोटी क्रिकेटसाठी खराब असल्याचे मत माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले. ११६ कसोटी सामने खेळलेले वेंगसरकर म्हणाले, ‘दोन्हीही संघात उत्कृष्ट खेळाडू आहेत. रूटसारख्या महान फलंदाजाला एक गोलंदाज बनताना पाहतो तेव्हा कसोटी क्रिकेटमध्ये काहीतरी काळेबेरे असल्याची खात्री पटते.’ अहमदाबाद कसोटीत एकूण ८४२ चेंडूंचा खेळ झाला. १९३४-३५ नंतर कसोटी इतिहासात हा सर्वांत लहान सामना होता. वेंगसरकर यांनी इंग्लिश फलंदाजांच्या बचावात्मक शैलीवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, ‘इंग्लंडकडे इच्छाशक्तीचा अभाव होता. सरळ चेंडूवर बचाव करणे कठीण जात होते. असे चेंडू खेळण्यास कौशल्य लागते, असे मुळीच नाही.’मॅच रेफ्रीच्या अहवालाकडे लक्षयासंदर्भात बीसीसीआयच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली. हा अधिकारी म्हणाला, ‘दोन्ही संघांना सारखी मदत करेल अशी ठोस खेळपट्टी तयार करण्यात येत आहे. हा सामना पारंपरिक लाल चेंडूवर खेळला जाणार असल्याने ४ मार्चपासून दोन्ही संघ मोठा धावडोंगर उभारू शकतात. या मैदानावर धूळधाण करणारी खेळपट्टी तयार करण्यात अर्थ नाही. कारण येथे आयपीएल आणि टी-२० विश्वचषकाच्या काही सामन्यांचे आयोजन करायचे आहे. एकाच ठिकाणी दोन सामने होणार असल्याने अखेरचा सामना संपल्यानंतरच आयसीसी मॅच रेफ्री जवागल श्रीनाथ हे आयसीसीकडे अहवाल सादर करतील. अहवालाच्या आधारे आयसीसी कारवाईसंबंधी निर्णय घेईल.’

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंड