रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या सलग पराभवाचे कारण शोधणे खूप गुंतागुंतीचे आहे. या अपयशाचे एक कारण नाही. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही क्षेत्रांत त्यांना छाप पाडता आलेली नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आरसीबी संघात खूप चांगले खेळाडू आहेत. त्यामुळेच त्यांच्या अपयशाचे आश्चर्य वाटते. माझ्या मते संघावर अपेक्षांचे ओझे खूप आहे, त्यामुळेच त्यांचा संघ दडपणाखाली भासतो.
काही प्रमाणात कर्णधार विराट कोहलीने चांगल्या खेळी केल्या. पण तो त्याच्या लौकिकाप्रमाणे खेळण्यात अपयशी ठरला आहे. तसेच एबी डिव्हिलियर्सही फारसा वरचढ दिसून आला नाही. हे दोघे अपयशी ठरले, तर धावा निघत नाहीत आणि त्यामुळे गोलंदाजांवर अधिक जबाबदारी येते. त्यातच गोलंदाजांनी बळी घेण्याच्या संधी निर्माण केल्या, तर क्षेत्ररक्षकांकडून झेल सुटतात. तांत्रिक व आकडेवारीच्या जोरावर आरसीबीकडे प्ले आॅफ गाठण्याची अजूनही संधी आहे. एकही पराभव त्यांना स्पर्धेबाहेर करू शकतो. त्यामुळे जवळपास त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.
कर्णधार म्हणून विराट कोहलीवरही मोठी टीका झाली. इतर खेळांच्या तुलनेत क्रिकेटमध्ये कर्णधाराची सर्वांत महत्त्वाची भूमिका असते. क्रिकेटमध्ये प्रत्येक गोष्ट कर्णधार निर्धारित करीत असतो. कर्णधाराचे निर्णय चुकले, तर त्या अपयशाची जबाबदारी कर्णधारावरच येते. कोहलीने प्रयत्न केले नाहीत असेही नाही. त्यामुळे पुन्हा एकदा कोहलीच्या नेतृत्वक्षमतेवर प्रश्न निर्माण झाले. आतापर्यंत आरसीबीने कधीही जेतेपद जिंकलेले नाही. याचा अर्थ कोहली वाईट कर्णधार आहे, असाही होत नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताने त्याच्याच नेतृत्वात चांगली कामगिरी केली आहे.
- अयाझ मेमन संपादकीय सल्लागार