मुंबई : पराभवाची मालिका खंडित करून सलग तीन विजय मिळविणारा मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात उद्या रविवारी आयपीएलमध्ये वानखेडे स्टेडियमवर जो सामना खेळला जाईल. त्यातील पराभूत संघ प्ले आॅफच्या शर्यतीतून बाद होणार आहे.
मुंबई आणि राजस्थानचे प्रत्येकी ११ सामन्यांतून समान १० गुण आहेत. मुंबईकडून एव्हिन लुईसचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी धावा काढल्या. सूर्यकुमार यादव संघाला चांगली सुरुवात करून देत असून रोहित शर्मा कर्णधारपदाची जबाबदारी निभावत आहे. मधल्या फळीचे अपयश हे मात्र मुंबईच्या चिंतेचा विषय आहे. बेन कटिंग आणि हार्दिक पंड्या यांची बॅट तळपल्यास त्यांंना रोखणे प्रतिस्पर्धी संघाला जड जाऊ शकते. विजयासाठी मुंबईला सांघिक योगदान देण्याचे आव्हान असेल. गोलंदाजीत युवा लेगस्पिनर मयंक मार्कंडेय या सत्रातील शोध आहे. याआधी २०१५ मध्ये मुंबईने सुरुवातीचे सहा सामने गमावूनही मुसंडी मारून जेतेपद पटकविले होते. यंदा त्यांच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.
राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलर संघाचे भाग्य बदलू शकतो. याशिवाय खराब कामगिरीने त्रस्त असलेला कर्णधार अजिंक्य रहाणे यालादेखील साजेशी खेळी करावी लागेल. संजू सॅम्सन, स्टुअर्ट बिन्नी आणि राहुल त्रिपाठी हे फलंदाजीत योगदान देऊ शकतात. इंग्लंडचा गोलंदाज बेन स्टोक्स मात्र अपेक्षापूर्ती करू शकलेला नाही. याशिवाय मोठी रक्कम मिळालेला जयदेव उनाडकट फ्लॉप ठरला आहे. (वृत्तसंस्था)