हैदराबाद : आयपीएलमध्ये आज रविवारी सनराइजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात लढत होत आहे. मागच्या सामन्यात ख्रिस गेलच्या तुफानी शतकाच्या बळावर किंग्स पंजाबने हैदराबादचा विजयरथ रोखला होता. मोहालीतील या सामन्यात पंजाबकडून गेलने ६४ चेंडूत १०४ धावा ठोकल्या होत्या. हैदराबाद आणि चेन्नई यांनी चारपैकी प्रत्येकी तीन विजय आणि एक पराभव अशी वाटचाल केली. राजीव गांधी स्टेडियमवर जो संघ जिंकेल तो आघाडी मिळविणार आहे.
दोन वर्षांनंतर पुनरागमन करणाऱ्या चेन्नईची सुरुवातही झकास झाली. पहिल्या दोन सामन्यात त्यांना विजय मिळविता आला तर तिसºया सामन्यात धोनीच्या दमदार खेळीनंतरही त्यांना पंजाबकडून पराभूत व्हावे लागले. हैदराबादचे गोलंदाज फॉर्ममध्ये आहेत. त्यात भुवनेश्वर, सिद्धार्थ कौल, विली स्टानलेक आणि शकीबुल हसन यांचा समावेश आहे. अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान हा मात्र संघर्ष करताना दिसतो. मागच्या सामन्यात त्याने ४ षटकांत ५५ धावा मोजल्या. सुपरकिंग्ससाठी सहा गडी बाद करणारा वाटसन सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये तुलना झाल्यास सनराइजर्सचे पारडे जड वाटते. आयपीएलचा सर्वात संतुलित संघ या आशयाने हैदराबादकडे पाहिले जाते.
फलंदाजीत सुपरकिंग्सचे पारडे जड वाटते. त्यांच्याकडे सातव्या स्थानापर्यंत फलंदाज आहेत.
(वृत्तसंस्था)