कोलकाता : गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेला कोलकाता नाईट रायडर्स आणि शानदार फॉर्मात परतलेला किंग्स इलेव्हन पंजाब संघादरम्यान शनिवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत आक्रमक फलंदाज विंडीजचे आंद्रे रसेल व ख्रिस गेल यांच्या कामगिरीवर लक्ष राहील.
गेलने गुरुवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध यंदाच्या मोसमातील पहिले शतक झळकावताना ६३ चेंडूंमध्ये नाबाद १०४ धावांची खेळी केली. गेलने या खेळीदरम्यान ११ षटकार लगावले. त्यातील ६ षटकार राशिद खानसारख्या दर्जेदार फिरकीपटूच्या गोलंदाजीवर लगावले आहेत.
गेलने शतकी खेळी करीत आयपीएलच्या लिलावामध्ये खरेदीदार न मिळाल्याचे शल्य काही अंशी भरून काढले. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू व केकेआर संघाचा सदस्य राहिलेला गेल आयपीएलच्या १० वर्षांच्या कारकिर्दीनंतर यंदाच्या मोसमात झालेल्या लिलावामध्ये पहिल्या फेरीत विकला गेला नव्हता. त्यानंतर मेंटर वीरेंद्र सेहवागने त्याला पंजाब संघासाठी करारबद्ध केले.
गेल म्हणाला, ‘अनेकांनी म्हटले की, गेलला काही सिद्ध करायचे आहे. वेळ कुणासाठी थांबून राहत नाही, पण मी काही सिद्ध करण्यासाठी खेळत नाही. मी माझ्या उर्वरित कारकिर्दीचा आनंद घेण्यास प्रयत्नशील आहे.’ ईडन गार्डन्सवर गेलला वेस्ट इंडिजचा सहकारी खेळाडू सुनील नारायण, भारतीय फिरकीपटू कुलदीप यादव, पीयूष चावला आणि नितीश राणा यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. आर. अश्विनच्या नेतृत्वाखाली पंजाब संघ चांगली कामगिरी करीत आहे. त्यांच्याकडे गेल व्यतिरिक्त एल. राहुल, अॅरोन फिंच व भारतीय स्टार युवराज सिंगसारखे आक्रमक फलंदाज आहेत.
केकेआरच्या रसेलने गेल्या लढतीत दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध मिळवलेल्या विजयात १२ चेंडूंमध्ये ४१ धावा फटकावल्या होत्या. युवा खेळाडू नितिश राणा सलग दोन सामन्यांत सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. राणाने बेंगळुरूविरुद्ध विराट कोहली व राजस्थानवरुद्धच्या लढतीत अजिंक्य रहाणेचा बळी घेतला होता. अफगाणिस्तानचा फिरकीपटू मुजीबर रहमान यांच्या कामगिरीवरही सर्वांची नजर राहील. (वृत्तसंस्था)
सामन्याची वेळ :
सायंकाळी ४ वाजता
स्थळ : इडन गार्डन्स स्टेडियम, कोलकाता.