Join us  

क्रीजचा वापर केला तर चहल अधिक प्रभावी ठरेल

मुश्ताक अहमद : ऑस्ट्रेलियाचा अ‍ॅडम जम्पा व पाकिस्तानचा शादाब खान हेसुद्धा चांगले लेग स्पिनर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2020 11:56 PM

Open in App

नवी दिल्ली : यजुवेंद्र चहल सध्या विश्व क्रिकेटमधील अव्वल लेग स्पिनर्सपैकी एक आहे, पण क्रीजचा चांगला वापर केला तर आणखी प्रभावी ठरू शकतो, असे मत पाकिस्तानचा माजी फिरकीपटू मुश्ताक अहमदने व्यक्त केले. जगभरात प्रशिक्षकाची भूमिका बजाविणारा मुश्ताक सध्या पाकिस्तान संघाचा सल्लागार आहे. मुश्ताक म्हणाला, ‘मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मधल्या षटकांत बळी घेण्याच्या क्षमतेमुळे चहल व कुलदीप यादव भारतासाठी सामन्याचे चित्र बदलणारे गोलंदाज झाले आहेत.

मुश्ताक म्हणाला, ‘चहल चांगला गोलंदाज आहे, पण क्रीजचा तो चांगला वापर करू शकतो. काही वेळा तो क्रीजच्या बाहेरून मारा करू शकतो. खेळपट्टीचे स्वरूप ओळखण्याची क्षमता असायला हवी. पाटा खेळपट्टीवर यष्टीच्या रोखाने मारा करणे योग्य ठरते. चेंडू जर ग्रिप घेत असेल तर फलंदाजांना अडचणीत आणण्यासाठी क्रीजच्या बाहेरही जाता येईल. अशा परिस्थितीमध्ये गुगली चेंडू फलंदाज विचार करतो तेवढा वळणार नाही आणि तुम्हाला बळी घेता येईल.’

मुश्ताक म्हणाला, चहल व यादव यांना यष्टीपाठी असलेला माजी कर्णधार एम.एस. धोनीकडून मिळणाऱ्या सल्ल्याचा बराच लाभ झाला.चहलने अलीकडच्या कालावधीत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगली छाप सोडली आहे. त्याने दिग्गजांना पिछाडीवर सोडत संघात स्थान मिळवले आहे.

मुश्ताकने पुढे सांगितले की, ‘तुम्हाला फलंदाजापेक्षा एका पाऊल पुढचा विचार करावा लागेल. फलंदाजाच्या क्षमतेनुसार क्षेत्ररक्षण सजवावे लागेल. आक्रमण गोलंदाजीने नाही तर क्षेत्ररक्षणाने करा, असे मी नेहमीच म्हणतो. हे कळले की नेहमी यश मिळते. आपल्या गोलंदाजांचा वापर कसा करायचा, याचा धोनी माहीर आहे आणि आता विराट कोहलीसुद्धा.’ मुश्ताकने चहल व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा अ‍ॅडम जम्पा व पाकिस्तानचा शादाब खान यांना सध्याच्या काळातील सर्वश्रेष्ठ लेगस्पिनर असल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :युजवेंद्र चहल