इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2022) पुढील पर्वासाठी ८ फ्रंचायझींनी आपापल्या ताफ्यातील काही खेळाडूंना कायम राखले आणि आता कोणाला ताफ्यात घ्यायचे याचे डावपेच आखताना दिसत आहेत. चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) आयपीएल २०२२साठी रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी, मोईन अली आणि ऋतुराज गायकवाड या खेळाडूंना कायम राखले आहे. फॅफ ड्यू प्लेसिस व ड्वेन ब्राव्हो हे स्टार या लिस्टमधून गायब झाल्यानं चाहते काहीसे निराश आहेत. पण, फॅफची उणीव भरून काढण्यासाठी CSKनं एका २४ वर्षीय तगड्या खेळाडूला ट्रायलसाठी बोलावलं आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील छोट्याश्या कारकीर्दित या खेळाडूनं २४ षटकार खेचले आहेत. स्थानिक क्रिकेटमध्ये ओडिशाकडून खेळणारा हा खेळाडू आता CSKसाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो.
चेन्नई सुपर किंग्सनं ओडिशाचा कर्णधार सुभ्रांशू सेनापती (Subhranshu Senapati ) याला ट्रायल साठी बोलावलं आहे. ओडिशा क्रिकेटनं ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी विजय हजारे ट्रॉफी व सय्यर मुश्ताक अली ट्रॉफीतील सुभ्रांशूच्या कामगिरीच्या काही क्लिप शेअर केल्या आहेत. या दोन स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावरच CSKनं त्याला ट्रायलसाठी बोलावलं आहे.
सुभ्रांशू सेनापती हा यावर्षी विजय हजारे ट्रॉफीत आपल्या संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्यानं ५ सामन्यांत १ शतक व २ अर्धशतकांसह २७५ धावा केल्या. तेच ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये त्यानं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत ५ सामन्यांत १३८ धावा केल्या. ओडिशाचे प्रतिनिधित्व करताना त्यानं २६ ट्वेंटी-२० सामन्यांत २४ षटकार व ५० चौकारांसह ६३७ धावा केल्या आहेत. ओडिशा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष पंकज लोचान मोहंती व सचिव संजय बेहेरा यांनी सेनापती CSKच्या ट्रायलमध्ये यशस्वी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.