नवी दिल्ली : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स या दोन संघांच्या कर्णधारांव्यतिरिक्त आयपीएलच्या ११ व्या पर्वात सहभागी असलेल्या अन्य सहा संघांच्या कर्णधारांना बीसीसीआय बोलविणार नाही. ७ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या या झटपट क्रिकेटचे उद्घाटन त्याच दिवशी सलामी लढतीपूर्वी छोटेखानी सोहळ्याद्वारे होईल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आठही फ्रॅन्चायसींचे कर्णधार ६ एप्रिल रोजी मुंबईत एका विशेष व्हिडिओ शूटसाठी एकत्र येत आहेत. त्याच दिवशी सायंकाळी सर्व कर्णधार आपापल्या शहरात परतही जातील. मागच्या वर्षीपर्यंत आयपीएलचा उद्घाटन सोहळा एक दिवस आधी व्हायचा. त्यात सर्व संघांचे कर्णधार सहभागी होऊन खेळभावनेची शपथ घेत असत. यंदा आयपीएल संचालन परिषदेच्या बैठकीत उद्घाटनाचा सोहळा ७ एप्रिल रोजी मुंबई-चेन्नई सामन्यापूर्वी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आयपीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दुसºया दिवशी म्हणजे ८ एप्रिल रोजी दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब हा सामना मोहालीत दुपारी ४ वाजेपासून आणि आरसीबी-केकेआर हा सामना रात्री ८ वाजेपासून खेळला जाईल. आयपीएल संघांना सरावासाठी वेळ कमी आहे. गौतम गंभीर आणि रविचंद्रन अश्विनसारखे खेळाडू सामन्याच्या एक दिवस आधी मुंबईत दुपारी येत आहेत. या खेळाडूंना आपापल्या शहरात परत जाण्यासाठी सायंकाळी विमान नाही. ते रात्री ९ नंतरच्या विमानाने रवाना होऊ शकतील. रविवारी सकाळी दिल्ली ते चंदीगड प्रवास शक्य नाही; कारण चंदीगड विमानतळ रविवारी बंद असते. अशावेळी खेळाडूंना कारने सामन्याच्या दिवशी सकाळी प्रवास करावा लागेल. (वृत्तसंस्था)
डीआरएस लागू होणार
- यंदाच्या आयपीएल सत्रापासून डीआरएस प्रणालीचा वापर करण्यात येईल, अशी माहिती आयपीएल आयुक्त राजीव शुक्ला यांनी बुधवारी मुंबईत दिली. सध्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांतरही डीआरएस प्रणालीचा वापर होत आहे.
- मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाध साधताना शुक्ला म्हणाले की, ‘डीआरएस लागू करण्याबाबत मोठ्या कालावधीपासून विचार सुरु होता. त्यानुसार यंदाच्या सत्रापासून ही प्रणाली
लागू होईल.’ आंतरराष्ट्रीय स्तरावरील टी२० सामन्यातील प्रत्येक डावामध्ये संघांना पंचांच्या निर्णयाविरुद्ध दाद मागण्याची एक संधी मिळते.
- मोहम्मद शमीवर लावण्यात आलेल्या आरोपांविषयी शुक्ला यांनी सांगितले की, ‘या प्रकरणी बीसीसीआय भ्रष्टाचार विरोधी संघटनेचे प्रमुख नीरज कुमार यांच्या अहवालाची प्रतीक्षा करत आहे. आम्हाला शमीच्या वैयक्तिक आयुष्याची काहीही घेणेदेणे नाही.’