Join us  

Breaking News : मोठी घोषणा, भारताविरुद्धच्या सामन्यानंतर ख्रिस गेल होणार निवृत्त

ख्रिस गेल निवृत्त होणार असल्याच्या वृत्ताने क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 5:48 PM

Open in App

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेल निवृत्त होणार असल्याच्या वृत्ताने क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे. कारण गेलने यंदाचे आयीपएल चांगलेच गाजवले होते. त्याचबरोबर विश्वचषकातही त्याचा बॅटमधून धावा बरसल्या होत्या. त्यामुळे गेलच्या निवृत्तीच्या निर्णयाने साऱ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.

निवृत्तीबाबत गेल म्हणाला की, " माझ्या कारकिर्दीचा हा काही शेवट नाही. मी कदाचित अजून एक मालिका नक्कीच खेळेन. आता विश्वचषकानंतर वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यामध्ये मालिका खेळवण्यात येणार आहे. भारताविरुद्ध मी कदाचित कसोटी मालिका खेळेन. त्यानंतर भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मी नक्कीच खेळणार आहे. पण ट्वेन्टी-२० मालिकेत मात्र मी खेळणार नाही."

वेस्ट इंडिजच्या प्रसारमाध्यमांचे व्यवस्थापक फिलीप स्पुनर यांनी ही गोष्ट अधिक स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, " हो, भारताविरुविरुद्धच्या मालिकेनंतर ख्रिस गेल हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणार आहे."

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील विश्वचषकातील सामना गुरुवारी मँचेस्टर येथे होणार आहे. बुधवारी भारताविरुद्धच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला वेस्ट इंडिजची एक पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला गेल आला होता. पत्रकार परिषदेमध्ये गेलने आपण यानंतर किती सामना खेळणार किंवा किती सामने खेळायला उत्सुक आहे, याबद्दल भाष्य केले.  गेलच्या या म्हणण्यानुसार तो आता निवृत्ती पत्करणार, असे बऱ्याच जणांना वाटत होते. त्यामुळे पत्रकारांनी या  परिषदेनंतर वेस्ट इंडिजच्या मीडिया मॅनेजरला गाठले. मीडिया मॅनेजरने गेल हा भारताविरुद्धच्या मालिकेनंतर निवृत्ती घेणार असल्याचे स्पष्ट केले. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये ऑगस्ट महिन्यात मालिका होणार आहे. गेल भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळणार आहे. या मालिकेनंतर गेल निवृत्त होणार असल्याचे म्हटले जात आहे. कारण यानंतर ट्वेन्टी-२० मालिकेत तो खेळणार की नाही, याबाबत संदिग्धता आहे.

टॅग्स :ख्रिस गेलवेस्ट इंडिज