Join us  

गोलंदाजांनी कमावले, फलंदाजांनी गमावले; पंजाबने गमावला हातातला सामना

चेन्नईने २८ धावांनी मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 5:23 AM

Open in App

धर्मशाला : गोलंदाजांच्या सांघिक कामगिरीच्या जोरावर पंजाबने गतविजेत्या चेन्नईला २० षटकांत ९ बाद १६७ धावांत रोखले. परंतु, फलंदाजांच्या हाराकिरीमुळे पंजाबला विजयी स्थितीतून सामना गमवावा लागला. चेन्नईने पंजाबला २० षटकांत ९ बाद १३९ धावांवर रोखत २८ धावांनी विजय मिळवला. यासह चेन्नईने तिसऱ्या स्थानी झेप घेतली असून, पंजाब आठव्यास्थानी कायम आहे.

लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबने २ बाद ९ धावा अशा प्रतिकूल परिस्थितीतून ८व्या षटकात २ बाद ६२ धावा असे पुनरागमन केले. शशांक सिंग आणि प्रभसिमरन सिंग यांनी ५३ धावांची भागीदारी करत पंजाबला विजयी मार्गावर आणले होते. परंतु, मिचेल सँटनरने शशांकला बाद करून ही जोडी फोडली आणि पंजाबचा डाव बघता बघता कोसळला. ५५ धावांत ७ बळी गमावल्याने पंजाबची २ बाद ६२ धावांवरून १७.३ षटकांत ९ बाद ११७ असा घसरला. १३व्या षटकात जडेजाने कर्णधार सॅम करन आणि आशुतोष शर्मा यांना बाद करत पंजाबच्या फलंदाजीतील हवा काढली. जडेजाने तीन प्रमुख फलंदाजांना बाद करत चेन्नईला भक्कम स्थितीत आणले. त्याआधी, राहुल चहर आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी ३ बळी घेत चेन्नईला रोखले. जडेजाने फलंदाजीतही मोलाची भूमिका निभावत चेन्नईला दीडशेचा  पल्ला पार करून दिला. डेरील मिचेल आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड यांनी दुसऱ्या गड्यासाठी ३२ चेंडूंत ५७ धावांची भागीदारी केली.

 चेन्नईने यंदा ११ सामन्यांतून दहा सामन्यांत नाणेफेकीचा कौल गमावला. महेंद्रसिंग धोनी आपल्या टी-२० कारकिर्दीत पहिल्यांदाच नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनीला शून्यावर त्रिफळाचीत करणारा हर्षल पटेल हा आवेश खाननंतरचा केवळ दुसरा गोलंदाज ठरला. एकाच सामन्यात दोन्ही संघांचे यष्टिरक्षक शून्यावर बाद होण्याची आयपीएलमधील पाचवी वेळ ठरली.  आयपीएल सामन्यात ४०हून अधिक धावांची खेळी आणि तीन बळी घेण्याची अष्टपैलू कामगिरी रवींद्र जडेजाने तिसऱ्यांदा केली. यासह त्याने शेन वॉटसन आणि युवराज सिंग यांच्याशी बरोबरी केली. चेन्नईकडून सर्वाधिक १६व्यांदा सामनावीर ठरताना रवींद्र जडेजाने महेंद्रसिंग धोनीचा (१५) विक्रम मोडला.

टॅग्स :आयपीएल २०२४