विश्वचषकात दोन्ही उपांत्य सामने जवळपास एकसारखे झाले. न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या विजयात नव्या चेंडूने टाकलेला स्पेल निर्णायक ठरला. पाच धावा असताना रोहित, राहुल आणि विराट बाद होताच कोट्यवधी भारतीय निराश झाले. त्याचप्रमाणे ख्रिस व्होक्स आणि जोफ्रा आर्चर यांनी अॅरोन फिंच व डेव्हिड वॉर्नर यांना बाद करीत आॅस्ट्रेलियाचे सहाव्या जेतेपदाचे स्वप्न उद्ध्वस्त केले.भारत अंतिम फेरीमध्ये पोहोचला नाही, पण संघाची कामगिरी अप्रतिम झाली. साखळीत भारत अव्वल स्थानावर होता. न्यूझीलंडविरुद्धही भारतीय गोलंदाजांनी भरीव कामगिरी केली. २४० धावांचे माफक लक्ष्य गाठताना आघाडीच्या फळीच्या अपयशानंतर मधल्या फळीला संधी होती. प्रतिस्पर्धी शिस्तबद्ध माऱ्यापुढे हे काम कठीण ठरले. धोनी- जडेजा खेळत असताना भारत पराभवाकडे वाटचाल करीत होता. जडेजा प्रथमच विश्वचषकात फलंदाजी करीत होता. चेंडूवर तुटून पडताना त्याने संघात येण्याची साक्ष पटवून दिली. धोनी देखील शांतचित्ताने खेळत राहिला. मार्टिन गुप्तिलच्या ‘त्या’ थेट फेकीने मात्र घात झाला. तो धावबाद होताच भारताच्या आशेवर पाणी फेरले गेले. न्यूझीलंड गेल्या काही वर्षांपासून दमदार कामगिरी करीत आहे. हा संघ ग्लॅमरस नसला तरी अनेक ‘मॅचविनर’ संघाकडे आहेत.केन विलियम्सन याने रॉस टेलरसह ओल्ड ट्रॅफोर्डवर चांगली खेळी केली. केनचे नेतृत्व देखील चांगले होते. भारताला रोखायचे तर गडी बाद करावेच लागतील याची त्याला जाणीव होती. त्याने सर्कलच्या आत क्षेत्ररक्षक उभे करीत त्यानुसार मारा करून घेतला.दुसरा उपांत्य सामना चुरशीचा होण्याची अपेक्षा होती, पण सलामीवीर लवकर बाद होताच आॅस्ट्रेलियाची ‘पोलखोल’ झाली. स्टीव्ह स्मिथ याने कडवा संघर्ष केला. अॅलेक्स केरी याने आर्चरचा बाऊन्सर लागल्यानंतरही धाडसाने तोंड दिले.पण २२३ धावा इंग्लंडच्या ऊर्जावान आणि आक्रमक खेळाडूंची परीक्षा घेण्यासाठी पुरेशा नव्हत्या.जेसन रॉयने दणादण फटकेबाजी केली तर जॉनी बेयरेस्टो, ज्यो रुट आणि इओन मोर्गन यांनी आॅस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना संधी न देता चिवट खेळ केला. फायनलसाठी इंग्लंड बलाढ्य वाटतो. घरच्या मैदानाचा इंग्लंडला लाभ मिळेल पण या संघाला कुणी हरवू शकतो, तर तो न्यूझीलंड. मला अटीतटीच्या अंतिम फेरीची अपेक्षा आहे. त्यासाठी रविवारची प्रतीक्षा करावी लागेल.व्ही. व्ही. एस. लक्ष्मण
- Cricket Buzz»
- बातम्या»
- दोन्ही उपांत्य लढती एकसारख्याच ठरल्या
दोन्ही उपांत्य लढती एकसारख्याच ठरल्या
विश्वचषकात दोन्ही उपांत्य सामने जवळपास एकसारखे झाले. न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या विजयात नव्या चेंडूने टाकलेला स्पेल निर्णायक ठरला. पाच धावा ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 05:00 IST