Join us  

आयपीएल सामन्यांच्या स्थगितीनंतर न्यूझीलंडची दोन्ही पथके मायदेशी परतली, खासगी विमानाने टोकियोमार्गे न्यूझीलंडला पोहचले

क्रिकेटपटू ट्रेंट बोल्ट, फिन एलेन, जिमी नीशाम, एडन मिल्ने आणि स्कॉट कुगेलिन यांच्याव्यतिरिक्त प्रशिक्षक व माजी खेळाडू जेम्स पेमेंट व शेन बाँड त्याचप्रमाणे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे क्रिकेट संचालन संचालक माईक हेसन शनिवारी रात्री मायदेशी दाखल झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 6:06 AM

Open in App

ऑकलंड : कोविड-१९ संक्रमणामुळे मध्यात अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आलेल्या इंडियन प्रीमिअर लीगसोबत (आयपीएल) जुळलेले न्यूझीलंडचे सर्व क्रिकेटपटू व प्रशिक्षक दोन गटांत मायदेशी परतले आहेत. जैव सुरक्षित वातावरणात कोविड-१९ चा शिरकावा झाल्याचे आढळून आल्यानंतर ही टी-२० लीग चार मेपासून स्थगित करण्यात आली. (Both New Zealand teams return home after IPL matches abeyance)

क्रिकेटपटू ट्रेंट बोल्ट, फिन एलेन, जिमी नीशाम, एडन मिल्ने आणि स्कॉट कुगेलिन यांच्याव्यतिरिक्त प्रशिक्षक व माजी खेळाडू जेम्स पेमेंट व शेन बाँड त्याचप्रमाणे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे क्रिकेट संचालन संचालक माईक हेसन शनिवारी रात्री मायदेशी दाखल झाले.

आयपीएल स्थगित झाल्यानंतर न्यूझीलंडच्या पथकाला मायदेशी परत पाठविण्यासाठी दोन चार्टर्ड विमानांची व्यवस्था करण्यात आली होती. पहिले पथक बोम्बारडिय ग्लोबल एक्स्पेस खासगी विमानाने टोकियोमार्गे न्यूझीलंडला पोहोचले. रविवारी दुसरे पथक पोहोचले त्यात न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम व स्टीफन फ्लेमिंग यांचा समावेश होता.

- विस्टाजेटच्या दुसऱ्या विमानाने मॅक्युलम व फ्लेमिंग यांच्याव्यतिरिक्त आयपीएल प्रशिक्षक काईल मिल्स, वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन, समालोचक सायमन डोल व स्कॉट स्टायरिस व पंच ख्रिस गफानी रविवारी रात्री ऑकलंड विमानतळावर उतरले.- ‘स्टफ डॉट को डॉट एनझेड’च्या वृत्तानुसार मायदेशी परतल्यानंतर या लोकांना विलगीकरण कालावधी पूर्ण करावा लागेल.- कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळलेला यष्टिरक्षक फलंदाज टीम सीफर्ट अद्याप भारतात असून चेन्नईच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी प्रतीक्षा करीत आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मायकल हसीवरही कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर याच रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.- न्यूझीलंडचा ब्रिटनला जाणाऱ्या कसोटी संघाच्या सदस्यांमध्ये केन विलियम्सन, मिशेल सँटनर, काईल जेमिसन व फिजियो टॉम सिमसेक यांना मालदीवला पाठविण्यात आले. सुरुवातीच्या योजनेनुसार त्यांना नवी दिल्ली येथे थांबायचे होते.- या खेळाडूंना मालदीवला पाठविण्याचा निर्णय त्यांना ब्रिटनमध्ये प्रवेशासाठी एक आठवड्याचा विलंब होऊ शकतो, या सल्ल्याच्या आधारावर घेण्यात आला. सुरुवातीला त्यांचा ११ मेच्या आसपास ब्रिटनमध्ये जाण्याचा कार्यक्रम होता.- न्यूझीलंडचा संघ २ जूनपासून इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका केळणार आहे. त्यानंतर संघ १८ जूनपासून साऊथम्पटनध्ये  भारताविरुद्ध विश्व कसोटी चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे. 

 

टॅग्स :आयपीएल २०२१न्यूझीलंड