पणजी : प्रत्येकाचे काही ना काही स्वप्न असते. माझेही होते. फरक इतकाच की मी दोन स्वप्न पाहिले आणि ते पूर्णत्वाकडे नेले. अंगावर ब्ल्यू पोषाख आणि देशाची ब्ल्यू जर्सी असावी असे वाटायचे. आज देशाकडून खेळते आणि एअर फोर्स आॅफिसर म्हणून देशाची सेवाही करते. ही ब्ल्यू जर्सी मिळाली ती तुमच्यामुळेच, यात तुमच्या सगळ्यांचा खूप मोठा वाटा आहे, असे सांगत भारतीय महिला क्रिकेटपटू शिखा पांडे हिने समस्त गोमंतकीयांचे आभार मानले.
राज्याचा प्रतिष्ठेचा आणि सर्वोच्च क्रीडा नैपुण्य दिलीप सरदेसाई पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्काराच्या उत्तरात ती बोलत होती. ज्या वेगवान पद्धतीने ती मैदानात गोलंदाजी करते त्याच पद्धतीने ‘षटकार-चौकार’ ठोकत तिने उपस्थितांना जिंकून घेतली. शिखाच्या यशाच्या वाट्यात अनेकाच्या भूमिका आहेत. त्या प्रत्येकाची आठवण आणि त्यांचे नाव घेत तिने आभार मानले.
२०१६-१७ या वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर शानदार प्रदर्शन करणाºया शिखाची राज्य सरकारतर्फे देण्यात येणाºया या पुरस्कासाठी निवड करण्यात आली. क्रीडा मंत्री बाबू आजगावकर यांच्या हस्ते शिखाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आलो. पुरस्काराच्या रुपात तिला २ लाख रुपयांचा धनादेश, प्रशस्तीपत्र आणि दिलीप सरदेसाई यांचा ब्रांझचा अर्धपुतळा प्रदान करण्यात आला. यावेळी जलस्त्रोत मंत्री विनोद पालयेकर, दिलीप सरदेसाई यांच्या पत्नी नंदिनी सरदेसाई, क्रीडा संचालक व्ही.एम. प्रभुदेसाई, ब्रम्हानंद शंखवाळकर, गुरुदास वेर्णेकर, केंद्रीय विद्यालय-वेरे प्राचार्य परवेझ इस्लाम व शिक्षक वृंद तसेच शाळकरी मुले उपस्थित होते.
![]()
क्रीडा संचालक व्ही. एम. प्रभुदेसाई यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यांनी स्व. दिलीप सरदेसाई आणि गोव्याशी असलेले नाते कसे अतुट आहेत हे सांगत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. क्रिकेटमधील त्यांचे योगदान न विसरण्यासारखे आहे. दिलीप सरदेसाई यांचा जन्म गोव्यात झाला आणि त्यांची पुढील कारकीर्द मुंबईत झाली. आज शिखाबाबतही तसेच झाले. उत्तरप्रदेशमधून आलेल्या पांडे परिवारतील शिखाने गोव्यात कारकीर्द घडवली आणि आज राष्ट्रीय स्तरावर चमकत आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. तिने गोव्याच्या क्रीडा क्षेत्रात अधिकारी म्हणून उच्च पदावर काम करावे, अशी आमची इच्छा आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्राधान्य : आजगावकर
गोव्याची मुले क्रीडा क्षेत्रात प्रगती करीत आहेत. शिखाने आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याचे नाव उज्ज्वल केले. इतर खेळातही मुले पुढे जात आहेत. गोव्यात ल्युसोफोनियानंतरची सर्वात महत्वाची स्पर्धा म्हणजे राष्ट्रीय स्पर्धा होय. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आम्ही कामाला लागलो आहे. ८-९ महिन्यांत स्पर्धेसाठी साधनसुविधा पूर्ण केल्या जातील. गोव्यातील ही स्पर्धा सर्वाेत्तम ठरावी, यासाठी आमचा प्रयत्न आहे.जबाबदारी मोठी असली तरी सर्वाचे सहकार्य महत्वाचे आहे. विविध संघटना, प्रशिक्षक, खेळाडू आणि प्रशासनाचे अधिकारी यांनी मिळून काम करणे गरजेचे आहे, असे क्रीडा मंत्री बाबू आजगावकर यांनी यावेळी सांगितले. त्यांनी खेळांच्या विकासासाठी ‘अॅक्शन प्लान’ तयार केल्याचे सांगत व्यावसायिक कंपन्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही केले. क्रीडा पॉलीसीचा उल्लेख करीत त्यांनी विद्यार्थ्यांना याचा खूप फायदा झाला असून क्रीडा क्षेत्रातील गुण त्यांना शैक्षणिक क्षेत्रात भरारी घेण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले.
जेव्हा शिक्षकांचे डोळे पाणावतात....
आई वडिलांना श्रेय दिल्यानंतर शिखाने शिक्षकांचे आपल्या जीवनातील महत्व सांगितले. वडिल उत्तरप्रदेशचे पण माझ जन्म तेलंगणातला आणि प्राथमिक शिक्षण गोव्यात झाले. ज्या शिक्षकांनी मला क्रिकेटची बॅट हातात धरण्यास शिकविले ते आज माझ्या पुढे आहेत. ज्यांनी मला अभ्यासात घडवले त्या शिक्षकांपैकी बरेच शिक्षक येथेच आहेत. शिक्षकांची नावे घेत शिखा तिचा प्रवास सांगत होती. यावेळी शिक्षकांचा उर मात्र भरुन येत होता. त्यांचे डोळे पानावले. एक अभिमानाची भावना त्यांच्या चेहºयावर स्पष्ट जाणवत होती. शिखाने केंद्रीय विद्यालयातून आपले प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेतले.
महिला क्रिकेटपटूला पुरस्कार मिळाल्याचा आनंद : नंदिनी सरदेसाई
दिलीप सरदेसाई हे महान क्रिकेटपटू होते. क्रिकेट हीच त्यांची दुसरी पत्नी होती. त्या काळात त्यांनी खूप संघर्ष केला. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या दिवशी गोवा सरकारतर्फे दिलीप सरदेसाई यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो, याचा अभिमान वाटतो. मात्र गेल्या ८ वर्षांत एकाही क्रिकेटपटूला हा पुरस्कार मिळाला नव्हता. प्रथमच क्रिकेटपटू आणि ती सुद्धा महिला क्रिकेटपटूला पुरस्कार वितरीत केला गेला. याचा खूप आनंद वाटतो. काही कारणास्तव राजदिप सरदेसाई उपस्थित राहू शकले नाही. पण क्रिकेटपटूला पुरस्कार मिळाल्याचे त्यांनाही मोठे समाधान मिळाले असेल, असे नंदिनी सरदेसाई म्हणाल्या.
शिखाचे योगदान....
गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ उपविजेता ठरला होता. त्यात शिखाचाही महत्वाचा वाटा होता. वेगवान गोलंदाज असलेल्या शिखाने अंतिम सामन्यासह सात सामन्यात प्रतिनिधीत्व केले. तिने आठ बळी घेतले. भारतीय हवाई दलात अधिकारी पदावर असलेल्या शिखाने २०१४ पासून ३९ एकदिवसीय सामने, ३२ टी-२० आणि २ कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधीत्व केले. ती भारतीय महिला संघाची नियमित खेळाडू आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिच्या नावे बळींचे अर्धशतक (६४) आहे. आयसीसी मानांकनात ती चौथ्या स्थानी होती.
माझ्याकडे शब्द नाहीत : सुभाष पांडे
शिखाला राज्याचा सर्वोच्च पुरस्कार मिळाल्यानंतर तिचे वडिल सुभाष पांडे हे भावुक झाले. त्यांनी प्रतिक्रियेसाठी आपणाकडे शब्दच नसल्याचे सांगितले. तिच्या यशात तिची मेहनत, जिद्द, चिकाटी आहे. आमचे काहीही नाही. आज ती तिच्या मेहनतीमुळेच इथपर्यंत पोहचली. आम्ही मात्र नाममात्र आहोत. तुम्हा सगळ्यांचा पाठींबा आणि आशिर्वादामुळे शिखाने यश मिळवल्याचे पांडे म्हणाले. सुभाष पांडे हे केंद्रीय विद्यालय-आयएनएस मांडवी येथे प्राथमिक शिक्षक आहेत.
संस्कृती भवन येथे झालेल्या समारंभात भारतीय महिला क्रिकेटपटू शिखा पांडेला गोवा राज्याच्या सर्वोच्च क्रीडा नैपुण्य दिलीप सरदेसाई पुरस्कार प्रदान करताना नंदिनी सरदेसाई. सोबत गुरुदास वेर्णेकर, क्रीडा मंत्री बाबू आजगांवकर, जलस्त्रोत मंत्री विनोद पालयेकर, व्ही एम. प्रभूदेसाई आणि ब्रम्हानंद शंखवाळकर. (फोटोः गणेश शेटकर)