कोलकाता : ‘स्मिथची फलंदाजी नेहमी शानदार राहिली आहे. पण त्याच्यासाठी कर्णधारपद सांभाळणे आव्हानात्मक बनले आहे.
त्याला संघासाठी यशाचा मार्ग तयार करावा लागेल,’ असे आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क याने म्हटले.
क्लार्क म्हणाला, ‘‘खूप काळापासून स्मिथची फलंदाजी शानदार राहिली आहे. पण सध्या तो कर्णधार म्हणून आव्हानात्मक काळातून जात आहे. सध्या भारताविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतून त्याला संघाच्या पुनरागमनाचा मार्ग तयार करावा लागेल.’ बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवल्यानंतर आॅस्ट्रेलिया संघ भारत दौ-यावर आला असून पहिल्याच सामन्यात त्यांना पराभवास सामोरे जावे लागले आहे. त्यामुळेच, स्मिथपुढे कर्णधार म्हणून मोठे आव्हान असेल.’’
इडनगार्डनवर गुरुवारी (दि. २१) होणा-या दुस-या एकदिवसीय सामन्याआधी क्लार्क म्हणाला, की ‘आॅस्ट्रेलियाने पुनरागमन करण्याची वेळ आली आहे. माझ्या मते, मालिका कोणाच्या पक्षात जाईल, ते हाच सामना ठरवेल.’
त्याचप्रमाणे, क्लार्कने भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवचेही कौतुक केले. तो म्हणाला, ‘कुलदीप आक्रमण करणारा गोलंदाज आहे. त्याच्याकडे सर्व प्रकारचे कौशल्य असून तो दोन्ही बाजूला चेंडू वळवू शकतो. तसेच, तो लांबलचक स्पेल टाकू शकतो.
त्याने कसोटी सामन्यांमध्ये
चांगले प्रदर्शन केले.’ तसेच, ‘धोनीविषयी मला काहीच विचारू नका. तो २०१९ चा विश्वचषक खेळणार की नाही, हे विचारू नका.
तो २०२३ च्या विश्वचषकातही खेळेल,’ असेही क्लार्क या वेळी म्हणाला. (वृत्तसंस्था)
।चेन्नईमध्ये अपयशी ठरल्यानंतर डेव्हिड वॉर्नर कोलकातामध्ये पुनरागमन करेल. त्याने बांगलादेशमध्ये शतक ठोकले आहे. केवळ एका सामन्यावरुन त्याचे विश्लेषण योग्य ठरणार नाही. धावा काढण्याचे मार्ग तो नक्की शोधेल आणि तो नेहमीच असे करतो. या मालिकेत वॉर्नरचा मोठा प्रभाव राहिल.
- मायकल क्लार्क