Join us  

ICC World Cup 2019 : वेस्ट इंडिजला मोठा धक्का; अष्टपैलू खेळाडू दुखापतग्रस्त

श्रीलंकेनं यजमान इंग्लंडला पराभूत केल्यानंतर वेस्ट इंडिजच्या उपांत्य फेरीच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 12:45 PM

Open in App

मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : श्रीलंकेनं यजमान इंग्लंडला पराभूत केल्यानंतर वेस्ट इंडिजच्या उपांत्य फेरीच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. आज वेस्ट इंडिजचा संघ मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डवर न्यूझीलंडचा सामना करणार आहे. मात्र, या सामन्याला सामोरे जाण्यापूर्वी त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल दुखापतीमुळे या सामन्यात खेळणार नसल्याची माहिती कर्णधार जेसन होल्डरने दिली.  

''आमच्या संघात दुखातपीची समस्या वाढत आहे, परंतु उपयुक्त पर्यायातून सर्वोत्तम संघ मैदानावर उतरवण्याचा आमचा प्रयत्न असेल. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात रसेल खेळणार नाही. तो या सामन्यासाठी तंदुरूस्त होईल, असे वाटत नाही,'' असे माहिती होल्डरने दिली. मागील पाच वर्षांपासून रसेल गुडघ्याच्या दुखापतीवर उपचार घेत आहे. तो शंभर टक्के तंदुरुस्त कधीच नव्हता. इंग्लंड आणि बांगलादेश यांच्याविरुद्धच्या सामन्यात रसेलने संपूर्ण दहा षटकही टाकली नव्हती.  

विंडीज संघ गुणतालिकेत सध्या सातव्या क्रमांकावर आहे. पाच सामन्यांत त्यांच्या खात्यात केवळ तीनच गुण जमा झाले आहेत. त्यांनी पाकिस्तानला पराभूत करून दमदार सुरुवात केली, परंतु त्यांना सातत्य राखता आले नाही. त्यांना सलग तीन सामन्यांत पराभव पत्करावा लागला, तर एक लढत पावसामुळे रद्द झाली. त्यामुळे आजच्या लढतीत न्यूझीलंडला नमवून उपांत्य फेरीच्या आशा कायम राखण्याचा त्यांचा निर्धार आहे. '' उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्याची अजूनही आम्हाला संधी आहे. उर्वरित सर्व सामने आम्हाला जिंकावे लागतील आणि न्यूझीलंडविरुद्धचा सामना हा त्यादृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे," असे होल्डरने सांगितले.   

टॅग्स :वर्ल्ड कप 2019वेस्ट इंडिजन्यूझीलंड