- अयाझ मेमन
(संपादकीय सल्लागार)
श्रीलंकेत खेळल्या जात असलेल्या तिरंगी मालिकेत भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. मला वाटते की भारताने १७४ धावा केल्या त्या कमी पडल्या. एक वेळ वाटत होते की,१९० धावा होऊ शकत होत्या. अशा प्रकारच्या खेळपट्टीवर चांगल्या धावा निघतात. शिखर धवन याने ९० धावांची आकर्षक खेळी केली होती. त्याला चांगली साथ मिळायला हवी होती. या ठिकाणी युवा फलंदाजांच्या कामगिरीचे विश्लेषण करावे लागेल. युवा ऋषभ पंत याने मैदानात बराच वेळ घालवला. २३ धावादेखील केल्या, मात्र त्याला फार काही करता आले नाही. तसेच गोलंदाजीत वैविध्य आणण्याचा प्रयोग भारताला महागात पडला. शार्दुल ठाकूर याने तिसºयाच षटकात २७ धावा दिल्या. कुसाल परेरा याचे कौतुक केले पाहिजे. श्रीलंका भारताविरोधात बॅकफुटवर होती. भारताचे प्रमुख खेळाडू या मालिकेत खेळत नाहीत. भारताकडे धोनी, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव नाही. तरीही भारतीय संघात खूप गुणवत्ता आहे.
सराव नसतानाही भारतीय संघाने चांगला खेळ केला. तरीही श्रीलंकेच्या संघाचे कौतुक करावे लागेल. त्यांनी खूप चांगला खेळ केला. त्यामुळे त्यांचे मनोबल निश्चितच वाढले असेल. ही स्पर्धा त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे.
भारतीय संघाचा सामना आता बांगलादेशसोबत आहे. त्यामुळे हा सामना जिंकणे गरजेचे आहे. पहिल्या दोन सामन्यात जर तुम्ही पराभूत झालात तर तुम्ही तिरंगी मालिकेत चांगलेच अडचणीत येऊ शकतात.