Kavya Maran SRH IPL 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी ( Champions Trophy 2025 ) स्पर्धेत भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. न्यूझीलंडच्या संघाने बांगलादेशवर मिळवलेल्या विजयानंतर पहिल्या गटातून भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ सेमीफायनलला पोहोचले. दुसऱ्या गटात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तगडी टक्कर पाहायला मिळत आहेत. इंग्लंडने आतापर्यंत एक सामना खेळला असून त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. तशातच इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा स्टार गोलंदाज ब्रायडन कार्स ( Brydon Carse ) हा चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडला आहे. इंग्लंडच्या या धक्क्याने सनरायजर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन हिचीदेखील चिंता वाढली आहे. जाणून घेऊया, ब्रायडन कार्सला नेमके काय झालंय आणि तो कधी तंदुरुस्त होईल.
ब्रायडन कार्स दुखापतग्रस्त
२९ वर्षीय ब्रायडन कार्स हा इंग्लंडचा प्रतिभावान गोलंदाज आहे. भारताविरूद्धच्या मालिकेत त्याने चांगली कामगिरी करून साऱ्यांचे लक्ष वेधले होते. पण ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात ब्रायडन कार्सला दुखापत झाली. गोलंदाजीत लय सापडण्यास त्याला फारच अडचण झाली. त्याने सात षटकात ६९ धावा दिल्या आणि त्याला केवळ एकच विकेट काढता आली. या सामन्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने माहिती दिली की, त्याच्या डाव्या पायाच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून माघार घेतली आहे. ब्रायडन कार्सच्या जागी इंग्लंडच्या संघात रेहान अहमदला संधी देण्यात आली आहे.
काव्या मारनची चिंता वाढली...
यंदाच्या मेगालिलावाआधी काव्या मारनने हेन्रिक क्लासेन (दक्षिण आफ्रिका) २३ कोटी, पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) १८ कोटी, अभिषेक शर्मा (भारत) १४ कोटी, ट्रेविस हेड (ऑस्ट्रेलिया) १४ कोटी आणिनितीश कुमार रेड्डी (भारत) ६ कोटी या खेळाडूंना संघात कायम ठेवले होते. त्यानंतर लिलावात त्यांना वेगवान गोलंदाजी करू शकणाऱ्या ऑल राऊंडरची गरज होती. त्यासाठी काव्या मारनच्या संघाने इंग्लंडच्या ब्रायडन कार्सवर बोली लावली. त्याआधी तो भारतात खेळलेला नव्हता. त्यामुळे त्याच्यावर फारशी होली लागली नाही. त्याला १ कोटींच्या मूळ किमतीत विकत घेतले गेले. पण आता पायाच्या दुखापतीमुळे कार्स CT बाहेर पडला आहे. त्यामुळे तो IPL खेळणार की नाही, याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे.