दुबई : सलामीवीर फलंदाज शिखर धवन आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांना दक्षिण आफ्रिकेवर टी-२0 आंतरराष्ट्रीय मालिकेतील २-१ विजयानंतर शानदार कामगिरीच्या बळावर आज ताज्या आयसीसी टी-२0 आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये खूप फायदा झाला आहे.
आयसीसी टी-२0 आंतरराष्ट्रीय सांघिक रँकिंगमध्ये भारताला एका गुणाचा लाभ मिळाला आहे आणि दक्षिण आफ्रिकेने एक गुण गमावला आहे, परंतु भारत आणि दक्षिण आफ्रिकेने आपले अनुक्रमे तिसरे आणि सातवे स्थान कायम ठेवले आहे. पाकिस्तान १२६ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. तो दशांश गुणाने आॅस्ट्रेलियाच्या पुढे आहे.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार जेपी ड्युमिनीने मालिकेत १२२ धावा केल्या. त्याचा चार गुणांनी लाभ झाला असून, तो फलंदाजी रँकिंगमध्ये २४ व्या स्थानावर पोहोचला आहे.
अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशीद खान झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतील कामगिरीमुळे गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.
राशीदने गेल्या आठवड्यात वनडेत संयुक्त पहिले स्थान मिळवल्यानंतर आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर पोहोचणारा सर्वात युवा क्रिकेटर बनला. शारजाहमध्ये झालेल्या दोन मलिकेदरम्यान त्याने पाच बळी घेत दोन्ही स्वरूपात अव्वल स्थान प्राप्त केले होते. न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज कॉलिन मुन्रो आणि आॅस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल हे क्रमवारीत अनुक्रमे फलंदाजीत आणि अष्टपैलूत अव्वल ठरले आहेत. ताज्या अपडेटमध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या तिरंगी मालिकेच्या निकालाचा समावेश नाही. याशिवाय दक्षिण आफ्रिकेतील तीन सामन्यांची मालिका ज्यात भारताने २-१ असा विजय मिळविला, तसेच श्रीलंकेचा बांगलादेशवरील २-0 विजयाचाही समावेश आहे. मुन्रोने या तिरंगी मालिकेत २ अर्धशतकांसह २१0 स्ट्राईकरेटने १७६ धावा करीत तीन क्रमांकांनी झेप घेतली. मॅक्सवेलने २२३ धावा करीत आणि स्पर्धेत ३ बळी घेत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान पुन्हा मिळवले.
फलंदाजांच्या रँकिंगमध्ये न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्टिल पाचव्या, इंग्लंडचा डेव्हिड मलान २२ व्या, बांगलादेशचा सौम्य सरकार
२0 व्या स्थानावर पोहोचला आहे.
इंग्लंड, आॅस्ट्रेलियासाठी सज्ज
भारतीय संघाची दक्षिण आफ्रिका दौºयातील कामगिरी यंदा होणाºया इंग्लंड व आॅस्ट्रेलिया दौºयासाठी भारतीय संघ सज्ज असल्याची प्रचिती देणारी असल्याचे भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने म्हटले आहे.
भुवनेश्वर म्हणाला, दोन चषकांसह खूश आहोत. भविष्यात सर्वंच चषक पटकावण्यात यशस्वी ठरू, अशी आशा आहे. हा दौरा शानदार ठरला, विशेषत: कसोटी मालिका. आम्ही दोन सामने गमावले असले तर पराभवामध्ये अधिक अंतर नव्हते. ज्या पद्धतीने खेळलो त्यामुळे आमचा आत्मविश्वास उंचावला आहे.
एका मालिकेमुळे झाला फायदा-
शिखरने ३ सामन्यांच्या टी-२0 आंतरराष्ट्रीय मालिकेत १४३ धावा केल्या. तो मालिकेत सर्वाधिक धावा फटकावणारा खेळाडू बनला आहे. त्याला १४ क्रमांकांनी फायदा झाला असून, त्याने २८ वे स्थान मिळविले आहे, तर सात विकेट घेऊन मालिकावीर ठरलेल्या भुवनेश्वरने २0 स्थानांची सुधारणा केली असून, तो १२ व्या स्थानावर पोहोचला आहे.