क्रिकेटवेड्या भारतासाठी यंदाचे वर्ष तुफानी यशस्वी ठरले. घरच्या मैदानावर खेळताना भारताच्या पुरुष संघाने मालिका विजयांचा धडाकाच लावला. त्याचवेळी, महिला संघानेही आपला हिसका दाखवताना विश्वचषक स्पर्धेत उपविजेत्या ठरल्या. यंदाच्या वर्षात कर्णधार म्हणून आक्रमक नेतृत्व केलेल्या विराट कोहलीने प्रतिस्पर्धी संघांना लोळवताना महान क्रिकेटपटूंच्या पंक्तीमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले. तसेच महिला संघाची कर्णधार मिताली राज हिनेही शानदार नेतृत्वगुण दाखवताना जागतिक क्रिकेटवर ‘राज’ केले. वर्षभरात कोहलीने सलग ९ मालिका जिंकल्या आणि आता त्याची सेना पुढील १८ महिन्यांत मिळणा-या कडव्या आव्हानांसाठी सज्ज झाली आहे. मितालीनेही गेल्या सहा महिन्यामध्ये आपल्या संघाच्या जोरावर एक कर्णधार ते भारतीय महिला क्रिकेटचा चेहरा असा अद्भुत प्रवास केला.
>भारतीय पुरुष क्रिकेट संघासाठी यंदाचे वर्ष जबरदस्त
भारतीय पुरुष क्रिकेट संघासाठी यंदाचे वर्ष जबरदस्त राहिले. भारतात आलेल्या प्रत्येक संघाला यजमानांचा धडाका रोखण्यात अपयश आले. त्याचवेळी, भारतीयांनी वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेतही विजयी पताका फडकावला. यंदाच्या मोसमात भारताने भलेही घरच्या मैदानावर जास्त सामने खेळले असतील, पण सलग नऊ कसोटी मालिका आणि सलग ८ एकदिवसीय मालिका जिंकणे सोपे नव्हते. यादरम्यान, भारताला पुण्यामध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध एका कसोटीत पराभव पत्करावा लागला.
इडन गार्डन येथे श्रीलंकेच्या वेगवान गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाजी पहिल्या डावात कोलमडली होती. मात्र, या दोन गोष्टी सोडल्या, तर भारताने एकहाती वर्चस्व राखले. त्याचवेळी, या शानदार कामगिरीमध्ये भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून झालेला हा पराभव भारताच्या जिव्हारी लागला होता.
>‘हिटमॅन’चा दणदणाट
रोहित शर्माने दुखापतीनंतर पुनरागमन करताना यंदाचे वर्ष चांगलेच गाजवले. एकदिवसीय क्रिकेटमधील तिसरे वैयक्तिक द्विशतक झळकावतानाच त्याने श्रीलंकेविद्धच्या टी२० मालिकेतही सर्वात वेगवान शतकी तडाखा दिला.
>भारतीय महिला संघाची चमकदार कामगिरी
भारताच्या महिला संघाने इंग्लंडच्या यजमानपदाखाली पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत हरमनप्रीत कौरने केलेली आॅस्ट्रेलियाची धुलाई आजही अनेकांच्या लक्षात आहे. या एका खेळीमुळे ती क्रिकेटवेड्या भारतीयांच्या घराघरात पोहचली. यानंतर, अंतिम सामन्यात यजमान इंग्लंडविरुद्ध मोक्याच्यावेळी झालेल्या चुकांचा फटका बसल्याने भारताला थोडक्यात विश्वविजेतेपदाने हुलकावणी दिली. मात्र, असे असले तरी स्पर्धेत केलेल्या शानदार प्रदर्शनाच्या जोरावर भारतीयांनी संपूर्ण महिला संघाला डोक्यावर घेतले.
खेळाडूंवर विविध क्षेत्रांतून आर्थिक बक्षिसांचा वर्षाव झाला. या कामगिरीनंतर खºया अर्थाने महिला क्रिकेट भारतात आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
>वेस्ट इंडिज दौ-यात भारतीय संघाची उत्कृष्ट खेळी
वेस्ट इंडिज दौ-यावर प्रशिक्षकाविना गेलेल्या भारतीय संघाने चमकदार कामगिरी केल्यानंतर श्रीलंकेला त्यांच्याच भूमीत ९-० असे लोळवले. यानंतर मायदेशात खेळताना टीम इंडियाने आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या मजबूत संघांना दबावाखाली आणत नमवले.
> कुंबळे आणि कोहलीमधील वाद गाजला
चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर भारतीय क्रिकेटमध्ये मोठा वाद उफाळला. कर्णधार कोहलीसोबतचे मतभेद खूप टोकाला गेल्यानंतर कुंबळे यांनी स्वत:हून प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आणि यानंतर ‘कर्णधार’ हाच एक ‘बॉस’ असतो हे स्पष्ट झाले. या प्रकरणाचा संघाच्या कामगिरीवर काहीच परिणाम झाला नाही. काही काळानंतरच परिस्थिती सामान्य झाली. तसेच, यानंतर कोहलीची पसंती असलेले रवी शास्त्री यांची प्रशिक्षकपदावर निवड झाली.
>‘विरुष्का’ यांचा विवाहसोहळा
वर्षाअखेरीस क्रिकेटसोबतच कर्णधार विराट कोहलीचे लग्नही चांगलेच गाजले. श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतून विश्रांती घेतल्यानंतर त्याने अभिनेत्री अनुष्का शर्मासह इटलीमध्ये विवाह केला. यानंतर भारत - श्रीलंका मालिका व ‘विरुष्का’ चर्चेचा विषय ठरले.
>मोसमाची सुरुवात इंग्लंडविरुद्धच्या विजयानं
यंदाच्या मोसमाची सुरुवात इंग्लंडविरुद्धच्या विजयाने झाली. मात्र खरा धमाका केला तो महेंद्रसिंग धोनीने. त्याने मर्यादित षटकातील कर्णधारपद सोडताना सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.