- रोहित नाईक उपमुख्य उपसंपादकरतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पंच परीक्षेत विदर्भाच्या पवन हलवणे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. अकोला जिल्ह्यातील सांगवी बाजार या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पवन यांनी आपल्या यशाने क्रिकेटप्रेमी तरुणांना करिअरची नवी दिशा दाखवली आहे. कुटुंबात खेळाचे वातावरण नसताना, क्रिकेटवरील प्रेमापोटी पवन यांनी घेतलेली झेप उल्लेखनीय आहे. यानिमित्ताने त्यांच्याशी खास बातचीत.
क्रिकेट पंच म्हणून तुमचा प्रवास कसा झाला? उत्तर : सौरव गांगुली यांचा माझ्यावर मोठा प्रभाव आहे. विश्वचषकातील त्यांची १८३ धावांची खेळी पाहून मी प्रेरित झालो. आठवीत असताना क्रिकेट खेळण्यासाठी अकोल्यात पुढील शिक्षणासाठी गेलो. तिथे शाळा जिल्हास्तरावर कर्णधार आणि ऑफ स्पिनर म्हणून छाप पाडली. विद्यापीठ आणि राज्यस्तरावरही खेळण्याची संधी मिळाली. पुढे खेळाडूव्यतिरिक्त पंचांच्या क्षेत्राविषयी माहिती मिळाली. एस. के. बन्सल या माजी आंतरराष्ट्रीय पंचांचे मार्गदर्शन लाभले.
या परीक्षेसाठी कसे पात्र ठरता येते? उत्तर : सुरुवातीला आपल्याला स्थानिक संघटनेकडे पंच म्हणून नावनोंदणी करावी लागते. तेथे एक-दोन वर्षे पंच म्हणून कामगिरी पाहिली जाते. येथून आपण राज्य समितीच्या निवड परीक्षेसाठी पात्र ठरतो. ही परीक्षा पास झाल्यानंतर पंच म्हणून दर्जेदार सामन्यांची जबाबदारी मिळते. राज्य संघटनेच्या पंच परीक्षेतून अव्वल चार उमेदवार बीसीसीआयच्या लेव्हल-२ पंच परीक्षेसाठी पात्र ठरतात. देशात ३८ राज्ये आहेत आणि प्रत्येकाचे ४ यानुसार १५२ उमेदवार बीसीसीआयच्या परीक्षेसाठी पात्र ठरतात. विदर्भ संघटनेसह बीसीसीआयच्या परीक्षेतही मी अव्वल क्रमांक पटकावला. यापुढे कामगिरीनुसार प्रवास ठरेल. आता रणजी, आयपीएल अशा स्पर्धांमध्ये पंचगिरी करण्याचे लक्ष्य आहे. तेथे चांगली कामगिरी केल्यास मला आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळू शकते.
ही परीक्षा कशी घेतली जाते?उत्तर : यंदा ही परीक्षा नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाली. पहिला टप्पा थिअरीचा असतो. एकाच हॉलमध्ये एकाच वेळी १५२ उमेदवारांची परीक्षा झाली. माझ्या मते यंदाचा पेपर सर्वांत आव्हानात्मक होता. पूर्ण परीक्षा इंग्रजी भाषेतूनच होते. यामध्ये सामन्यातील परिस्थितीनुसार, तसेच नियमांबाबत प्रश्न विचारले जातात. यानंतर प्रॅक्टिकल, व्हायवा-व्हिडीओ आणि शेवटी प्रेझेंटेशन होते. प्रेझेंटेशनमध्ये इंग्रजी संभाषण, आत्मविश्वास यांवर लक्ष दिले जाते. चिठ्ठी उचलून मिळणाऱ्या विषयावर प्रेझेंटेशन द्यावे लागते. मला ‘सुपर ओव्हर’ हा विषय आला होता.