Join us  

IPL 2019 : पुलवामा शहीदांच्या कुटुंबियांना बीसीसीआयची मदत, देणार 20 कोटी

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 40 सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) पुढाकार घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 3:56 PM

Open in App

नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 40 सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) पुढाकार घेतला आहे. शहीद कुटुंबियांच्या मदतीसाठीच्या आर्मी वेल्फेअर फंडमध्ये 20 कोटी देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 23 तारखेला होणाऱ्या पहिल्या सामन्यात बीसीसीआय भारतीय सैन्य दलाच्या तिनही तुकड्यांच्या प्रमुखांना निमंत्रित करणार आहेत.

आयपीएलचा उद्धाटनीय सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की,''आर्मी वेल्फेअर फंडासाठी 20 कोटींचा निधी देण्यास सीओएने मंजुरी दिली आहे.'' 

तत्पूर्वी, आयपीएलची ओपनिंग सेरेमनी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.  हा सोहळा रद्द करण्यात आला असला तरी या कार्यक्रमासाठी लागणारी रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबियांना देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीची एक बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यावर होणाऱ्या खर्चाची रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय झाला. प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी यावेळी सांगितले की, " यावेळी आम्ही आयपीएलचा उद्घाटन सोहळा करणार नाही. या सोहळ्यासाठी आम्ही एक बजेट ठरवले होते. जी रक्कम आम्ही बजेटसाठी ठरवली होती, ती रक्कम आम्ही शहीद जवानांच्या कुटुंबियांना देणार आहोत." 

मे-जून मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेमुळे आयपीएल यंदा मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. 23 मार्च पासून आयपीएल स्पर्धा सुरू होणार असल्याची घोषणा बीसीसीआयने केली होती. आयपीएल दरम्यान भारतामध्ये निवडणूका होणार आहेत. त्यामुळे आयपीएलचे सामना भारतात होणार की नाही याबाबत साशंकता होती. पण बीसीसीआयचेहंगामी सचिव अमिताभ चौधरी यांनी आयपीएलचे सर्व सामने भारतातच होतील, असे मत व्यक्त केले होते. पण, त्यावेळी त्यांनी वेळापत्रक जाहीर केले नव्हते. 

सध्याच्या सरकारचा कार्यकाळ मे महिन्यात संपणार आहे आणि त्यानंतर निवडणूक होतील. 30 मे ते 14 जून या कालावधीत वर्ल्ड कप स्पर्धाही होणार आहेत. त्यामुळे आयपीएलच्या वेळापत्रकाचे नियोजन करण्याची तारेवरची कसरत बीसीसीआयला करावी लागणार आहे. त्यामुळे पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 

टॅग्स :बीसीसीआयपुलवामा दहशतवादी हल्लाआयपीएल 2019